अहिल्याबाई होळकर चरित्र

निवेदन

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अशा व्यक्तींची साधारणतः शंभर ते सव्वाशे पानांची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती ‘महाराष्ट्राचे शिल्पकार' या योजनेअंतर्गत पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील ‘‘तेजस्विनी अहिल्याबाई होळकर'' हा बारावा चरित्रग्रंथ आहे.

या चरित्रग्रंथाच्या लेखिका श्रीमती विजया जहागीरदार यांनी या चरित्रग्रंथाच्या प्रारंभी जे मनोगत व्यक्त केले आहे त्या मनोगतात ‘‘त्या पुण्यशील, धार्मिक म्हणून तर अवघ्या जगास माहीत. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी, तळी, कुंडे, रस्ते, यासारखे प्रचंड कार्य तर आसेतुहिमाचल पसरलेले

आहे. पाणपोया, अन्नछत्रे आज दोनशे वर्षानंतरही चालू आहेत. हे कार्य अनेक मुखाने त्यांची धर्मपरायणता आणि औदार्य गर्जून सांगत आहे. परंतु आश्चर्याने थक्क करतं ते त्यांचं अपार शहाणपण, मुत्सद्दीपण, ज्ञानलालसा, असामान्य तडफ, हिशोबातली समूळ पारंगतता, तेज, झुंज घेण्याचा खंबीरपणा! प्रजावत्सलता, अचूक न्यायदान, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, संरक्षणव्यवस्था, गुप्तहेर खाते, स्वाभिमान, राज्यकारभाराची जाण, रणकौशल्य आणि माणुसकीशी घट्ट नातं असणारं परदु:खकातर असं मन! श्रीमंतांच्या गादीशी असलेली निष्ठा, जिद्द, बाणेदार वृत्ती, साधी राहणी आणि कल्याणकारी विचारसरणी. या अनेक सदुगुणांचे, त्यांच्या तेजस्वी वागण्याचे पुरावे इतिहासाच्या पानोपानी आहेत. त्यांची ही स्वाभिमानी आणि तेजस्वी बाजूसुद्धा सर्वांना कळावी, याचा ध्यास मला लागला." असे नमूद केले आहे.

त्यांचे हे मनोगत इतके बोलके आहे की, या ग्रंथाच्या संदर्भात मी काही वेगळे लिहिण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही.
या चरित्रग्रंथमालेतील यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अकरा चरित्रग्रंथांना मराठी वाचकांनी जसा भरघोस प्रतिसाद दिला त्या प्रमाणेच याही ग्रंथाला मराठी वाचक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.

रा. रं. बोराडे

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

मुंबई.

दिनांक : २६ जानेवारी, २००३

गेली कित्येक वर्षे माझं मन अहिल्यादेवींनी व्यापून टाकलं आहे. त्यातूनच सहा वर्षे अनेक पुस्तकांचे वाचन करून, अभ्यास करून 'कर्मयोगिनी' ही ३०० पानी चरित्र कादंबरी इतिहासाशी इमान राखून लिहिली. मध्यप्रदेश साहित्य अॅकॅडमीने त्या कादंबरीस भा. रा. तांबे पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला. त्यानंतर मुलांसाठी लोकमाता हे कथांचे पुस्तक लिहिले. (दिलीप महाजन - मोरया प्रकाशन - डोंबिवली) आणि आज ‘तेजस्विनी' हे देवींचे चरित्र लिहिले आहे. कितीही लिहिले तरी या अपूर्व स्रोचे वर्णन पूर्ण होत नाही.

त्या पुण्यशील, धार्मिक म्हणून तर अवघ्या जगास माहीत. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी, तळी, कुंडे, रस्ते, यासारखे प्रचंड कार्य तर आसेतुहिमाचल पसरलेले आहे. पाणपोया, अन्नछत्रे आज दोनशे वर्षांनंतरही चालू आहेत. हे कार्य अनेक मुखाने त्यांची धर्मपरायणता आणि औदार्य गर्जून सांगत आहे. परंतु आशयनि थक्क करतं ते त्यांचे अपार शहाणपण, मुत्सद्दीपण, ज्ञानलालसा, असामान्य तडफ, हिशोबातली समूळ पारंगतता, तेज, झुंज घेण्याचा खंबीरपणा! प्रजावत्सलता, अचूक न्यायदान, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, संरक्षणव्यवस्था, गुप्तहेर खाते, स्वाभिमान, राज्यकारभाराची जाण, रणकौशल्य आणि माणुसकीशी घट्ट नातं असणारे परदुःखकातर असं मन! श्रीमंतांच्या गादीशी असलेली निष्ठा, जिद्द, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी आणि कल्याणकारी विचारसरणी. या अनेक सद्गुणांचे, त्यांच्या तेजस्वी वागण्याचे पुरावे इतिहासाच्या पानोपानी आहेत. त्यांची ही स्वाभिमानी

आणि तेजस्वी बाजूसुद्धा सर्वांना कळावी याचा ध्यास मला लागला, त्यामुळेच हे लेखन तळमळीने झाले आहे. काही टीकाकारांनी त्यांच्या दानधर्मात होणा-या पैशांच्या उधळपट्टीला दोष दिलेला मी वाचला, अन् त्याचवेळी त्यामागची भूमिका आणि अनेक सद्गुण, सर्वांना कळलेच पाहिजे असे प्रकर्षाने वाटलं. पहिलीच गोष्ट अशी की दान हे आपल्या संस्कृतीचे वरदान आहे. त्याला कुणी उधळपट्टी म्हणत नाहीत. हा दानधर्म, इतकेच नव्हे तर अनेक मंदिरे, तळे, धर्मशाळा त्यांनी त्यांच्या खाजगी उत्पन्नातून केलेल्या आहेत. खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीवर पडू नये.' हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांच्यावर कोसळलेले कौटुंबिक आघात पाहिले तर त्यांच्या धार्मिक वृत्तीस दोष देण्याचे धारिष्कृय कुणालाच होणार नाही. पती खंडेरावांचा अकाली मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती! गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू जरी वयोमानाप्रमाणे झाले तरी अहिल्याबाईंचा आधारच निखळून पडला. मल्हाररावांच्या दोन बायकांना सती जातांना त्यांना पाहावं लागलं. याहूनही भयानक आघात पुढे होतेच. पुत्र मालेराव अवघ्या बावीस वर्षाच्या तरुण वयात मृत्यूमुखी पडला. त्याच्या दोन बायका सती गेल्या. मुक्ता ही मुलगी. तिचा मुलगा नथूही बावीसाव्या वर्षी क्षयाला बळी पडला. त्या दोन चिमण्या नातसुनांचं सती जाणं, त्यांना बघणं, त्यांच्या दुर्दैवात होतं. शेवटी मुक्ता फक्त राहिली होती. जावई यशवंतराव फणसे कॉलयाचा बळी ठरले आणि मुक्ता तिच्या दोन सवतींसह सती गेली. एकूण पांच जिवलगांचे मृत्यू आणि अठरा सतींच्या किंकाळ्या ज्यांनी ऐकल्या त्यांच्या वेदनांचे, दुःखाचं वर्णन कोण आणि कसं करणार? तरीही ही बाणेदार स्त्री शेवटपर्यंत कुणालाही शरण न जाता कठोर कर्मयोग आचरत राहिली. तुकोजीची कर्जे निवारत, पैसा पुरवित राहिली. त्यांच्या कर्तव्यकर्माचा पट मोठा आहे. बुद्धीचा आवाका दांडगा, सामर्थ्य थोर आहे!

हे सारे वाचकांना एकत्रितपणे कळावे म्हणून चरित्रकथनानंतरही मी चार प्रकरणे यात घातली आहेत. एकंदर आढावा, रुढीपरंपरा, मूळ तत्त्वे आणि कूटनीती या प्रकरणातून त्यांच्या राज्यकारभाराचे चित्र स्पष्ट होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अहिल्याबाईंच्या खुणा आहेत. त्यांचे कार्य वेगवेगळ्या रूपात उभे आहे. अहिल्याबाईंनी केलेला दानधर्म प्रजेच्या सुखासाठी केला. त्यांच्या औदार्याचा परिणाम त्यावेळच्या इतर राजांवरही झाला आणि तेही दानधर्म करू लागले. औदार्याचे बीज पेरण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. पुणे ही राजधानी असल्यामुळे पुणे दरबारी अहिल्यादेवींची तेजस्वी छाप पडली होती. 'पुणे दरबारचे पुण्यद्वार महेश्वर आहे.' असे खुद्द पेशव्यांनी म्हटले आहे. । अहिल्याबाईंनी दिलेल्या कित्येक गावाच्या जहागिन्या वंशपरंपरेने चालत होत्या. कूळकायदा १९५५ साली आल्यानंतर त्या जहागिन्या विलीन करण्यात आल्या.

महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, जीवनावर अहिल्याबाईंचा फार मोठा ठसा उमटलेला आपल्याला दिसतो. आज दोनशे वर्षानंतरही त्यांचे नांव ताजेतवाने आहे, हेच त्यांच्या कर्तृत्वाचे फार मोठे गमक आहे.

अहिल्यादेवी लोकमाता होत्या, पुण्यश्लोक होत्या. त्यांचे हे चरित्र अनेकांना धैर्य, शौर्य, स्फूर्ती, सामर्थ्य देवो अशी इच्छा व्यक्त करून, त्यांना अभिवादन, प्रणिपात आणि नमस्कार करून पूर्णविराम देते आणि हे चरित्र लोकार्पण करते.

-सौ. विजया जहागीरदार १ सोना मोती अपार्टमेंट, ५६०/५८ दक्षिण सदर बाजार, सोलापूर-४१३ ००३

कर्मयोगिनी अहिल्याबाई

हे चरित्र आहे अहिल्याबाई होळकर यांचे! लोकमाता, पुण्यश्लोक, देवी, गंगाजळ निर्मळ, या सगळ्या पदव्या, अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून! कुठलाही पदवीदान समारंभ न होताही, या पदव्या आज दोनशे वर्षे टिकून आहेत. टिकणार आहेत. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावं, इकडे लक्ष दिले. त्या धार्मिक होत्या हे तर, सर्वांना माहित आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार महत्त्वाचे आहे. अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक स्त्री होती. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे, अनेक संकटे त्यांनी पार केली. न्यायदान तर इतके अचूक की, भांडणाच्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत. रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदुःखाने व्याकूळ होणारं मन, त्यांना लाभलं होतं. त्या स्वतः रणांगणात युद्धाला उतरत! तोफा ओतणे, जंबुन्याच्या गोळ्या तयार करणे, याचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी स्त्रियांचे सैनिकदलही तयार केले होते. मातीवर, देशावर निष्ठा, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी, उच्च चारित्र्य हे त्यांचे विशेष! त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दु:खी, काळेकुट्ट असे होते. पण प्रशासन धवलशुभ्र, निष्कलंक असे! मला या चरित्रातून त्यांच्या या अनेक गुणांचा परिचय करून द्यायचा आहे. त्या धार्मिक होत्या पण धर्माध नव्हत्या. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, विहिरी, रस्ते असे त्यांचे कार्य आहे. अन्नछत्रे आणि पाणपोया आजही चालू राहिल्या आहेत. अनेकजण आपली भूकतहान तिथे शांत करीत आहे. हे सारे कार्य जातीधर्मात अडकलेले नाही. सर्व धर्मियांसाठी त्यांनी मदत केली. म्हणूनच केवळ 'धार्मिक इतकीच त्यांची ओळख नाही. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आजही जिवंत आहे कारण मंदिरे, दर्गे, अन्नछत्रे वगैरे ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी सालीना उत्पन्न करून ठेवले. त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे. त्यांच्यात अनेक सद्गुण बहरास आलेले होते. अठरा सतींच्या किंकाळ्या आणि सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले. शेवटी त्या एकट्या राहिल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून, ही बाणेदार स्त्री, कुणालाही शरण न जाता कर्तव्यकठोर असा कर्मयोग आचरत राहिली. प्रजेचं सुख बघत राहिली. दुःखाला खंबीरपणे सामोरे जातांनाही आपले कर्तव्य ठामपणे त्यांनी केले. हे सर्व वाचकालाही सामर्थ्य, शक्ति देणारे आहे. तेजस्विनी वाचून वाचकाला निश्चितपणे

आत्मविश्वास मिळेल. तेवढे सामर्थ्य अहिल्यादेवींच्या चरित्रात आहे आणि तेच मला प्रामुख्याने अधोरेखित करीत लिहायचे आहे.

मल्हारराव होळकरांच्या आधीचा काळ

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी मोहम्मद शहाची राजवट चालू होती. त्यावेळी माळवा प्रांतावर, दयाबहादूर राज्य करीत होता. मोहम्मद शहा सुखोपभोगात दंग होता. मोंगलांचे विस्तृत साम्राज्य अत्यंत स्वार्थी आणि लोभी माणसांच्या हातात सापडले होते. दयाबहादूर त्यातलाच एक! हा प्रजेचा अतोनात छळ करीत असे. त्याच्या अत्याचारांना प्रजा अगदी कंटाळून गेली होती. दयाबहादूरच्या राज्यात मोगल सम्राटांतर्फे राव नंदलाल यांना प्रमुख अधिकारी नेमण्यात आले. कर वसूल करण्याचे काम तेच करीत. आपल्या फौजेसह ते इंदुरास राहात. त्यामुळे दयाबहादूर प्रजेवर करत असलेले अत्याचार, त्यांना समक्ष दिसत. त्यांना प्रजेचा हा छळ सहन करणे कठीण होत होते. राव नंदलाल दयाबहादुरला सतत समजावत. अत्याचार, छळ थांबव अशी विनंती करीत. पण स्वार्थी दयाबहादुर लोभाने पिसाट झाला होता. अखेर राव नंदलाल बादशहांकडे गेले. त्यांना माळव्याची दयनीय स्थिती सांगितली. पण बादशहा आपल्या अधिका-यांवर वचक ठेवू शकला नाही.

अधिका-यांना धाक उरला नव्हता. अखेर राव नंदलाल निराश होऊन परत आले. बादशहाने राव नंदलालांची तक्रार ऐकून घेतली नाही हे कळताच दयाबहादुरला

आनंद झाला. तो अधिकच शिरजोरी करू लागला. राव नंदलाल दयाळू होते. माळव्याच्या लोकांचा छळ त्यांना बघवेना. राव नंदलाल बादशहाला दरवर्षी २५००० रुपयांचा वसूल देत. तो त्यांनी बंद केला आणि बादशहास कळवले की, ‘माळव्याच्या लोकांवर दयाबहादूरकडून जे अन्याय चालू आहेत ते यापुढे सहन केले जाणार नाहीत. आपल्या पाठिंब्यामुळेच दयाबहादुर शिरजोर झाला आहे. पण बादशहा केवळ उपभोगात दंग होता. त्याला हे ऐकण्यास वेळ नव्हता. कारवाई करण्यास वेळ नव्हता.

त्या काळात थोरले बाजीराव पेशवे, प्रजेच्या सुखासाठी, साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. राव नंदलाल यांनी पेशव्यांना पत्र पाठवून माळव्यातील लोकांचे हाल त्यांना कळवले. बादशहा आणि दयाबहादुर यांच्याकडून होत असलेल्या प्रजेच्या छळाची पूर्ण वार्ता कळवली आणि पुढे लिहिले की, 'आपण जर माळव्यावर चढाई केली तर मी आपणास सर्व तहेची मदत करेन.' थोरले बाजीराव अत्यंत शूर होते. त्यांनी लगेच मल्हारराव होळकरांना माळव्यावर चढाईसाठी पाठवले. राव नंदलाल यांनी भेरूघाटाच्या मार्गाने सैन्यास माळव्यात घुसविले. हे बघताच दयाबहादुर राव नंदलाल यांचे पाय धरू लागला. त्यांना अनेक प्रलोभने दाखवली. अधिकाराची पदे देऊ केली. पण राव नंदलाल आपल्या निश्चयापासून तसूभरही दूर गेले नाहीत. दयाबहादूर अखेर भीतीने फौजेसकट पळाला आणि अखेर १२ ऑक्टोबर १७३१ रोजी मारला गेला. मल्हाररावांनी माळव्यावर मराठ्यांचा झेंडा रोवला. | त्याच काळात अफगाण, फ्रेंच उदयास येऊ लागले होते. त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केला होता. इंग्रजांचे पाऊलही पुढे पडत होते. सिंध, पंजाब, काश्मीर यावर अधिकार करत अहमदशाह अब्दाली पुढे सरकत होता. पोर्तुगालने काही स्थाने घेतली होती. उत्तर भारताची स्थिती खालावत चालली. सर्वत्र अराजक आणि अशांतता पसरली होती. यामुळे शूर मराठ्यांच्या शौर्याला, पराक्रमाला जणु आमंत्रणच मिळाले. मराठ्यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. । त्या काळात महाराष्ट्रात फार एकी होती. नसानसातून जणु काही शौर्य पराक्रम सळसळत होता. पेशव्यांचा झेंडा भारतभर फडकवण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. याच काळात पेशव्यांनी भरपूर पैसा आणून आधी आपले राज्य शक्तिमान केले. चौथाई, सरदेशमुखीची वसूली केली. उत्तर भारतात पेशव्यांचा वचक बसवला. अशा रीतीने आपले सामर्थ्य वाढवून पेशव्यांनी बलाढ्य फौजेसह दिल्लीवर मोर्चा नेला. २८ फेब्रुवारी १७१९ रोजी, पेशव्यांनी बादशहाच्या वाड्याला वेढा दिला. २० मार्च रोजी त्यांनी बादशहाकडून तीन सनदा मिळवल्या. त्याद्वारे पेशव्यांना विस्तिर्ण प्रदेशात चौथाई आणि सरदेशमुखी करवसूलीचे अधिकार मिळाले. यावेळी मल्हारराव होळकर पेशव्यांबरोबर होते. मल्हाररावांनी शौर्याची शर्थ केली. ते पेशव्यांचे विश्वासू मित्र झाले. त्यांना बहुमोल अनुभव मिळाला. याच वेळी बाळाजी विश्वनाथ या थोरल्या पेशव्यांचा मृत्यू होऊन १७२० मध्ये बाजीराव पेशवे गादीवर आले. त्यांच्याशी मल्हाररावांचे भावासारखे प्रेमसंबंध निर्माण झाले. हे मल्हारराव होळकर म्हणजेच, अहिल्यादेवी होळकरांचे सासरे. मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेराव याच्याबरोबर अहिल्यादेवींचा विवाह झाला. आणि अहिल्याबाईच्या तेजस्वी गाथेची सुरवात झाली.

मल्हारराव होळकरांचे जीवन म्हणजे एक शौर्यगाथाच होती. होळकरांचे पूर्वज दक्षिण भारतातील वाफगाव इथे रैहात होते. परंतु काही काळानंतर ते पुणे शहराजवळच्या होळ या गावी स्थायिक झाले. म्हणूनच त्यांना होळकर असे नांव पडले. होळ येथील खंडोजी होळकर गावच्या पाटलाचे मदतनीस होते. त्यांना १६९३ साली पुत्ररत्नाचा लाभ झाला. हा पुत्र म्हणजेच मल्हारराव होळकर, मल्हाररावांनी आपल्या पराक्रमाने, इतिहासात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले. लहानपणी मेंढ्यांची राखण करणारा मल्हार मोठेपणी इतिहासप्रसिद्ध घटनांचा साक्षीदार झाला. प्रजेचा तारणहार झाला. एका थोर सेनेचा सूत्रधार झाला. असामान्य शौर्य, निष्ठा यांच्या बळावर पेशव्यांचा विश्वासू सुभेदार आणि सल्लागार झाला. त्यांचे चरित्र अत्यंत रोचक आणि स्फूर्तिदायक आहे. । रामनवमीस जन्माला आलेले मल्हारराव, लहानपणापासूनच धाडसी होते. भीती हा शब्दच त्यांना माहित नव्हता. आईवडिलांना त्याचा अभिमान वाटे. हे बाळ पुढे काहीतरी कर्तृत्व करून दाखवेल अशी त्यांना खात्री होती. पण दुर्दैवाने मल्हार तीन वर्षांचा होताच त्याचे पितृछत्र हरपले. खंडोजीचा मृत्यू झाला. आई जिवाईवर आकाश कोसळले. खंडोजीच्या कुटुंबियांनी मल्हारकडे पाठ फिरवली. उलट त्याच्या वाटेची जमीन हडप करण्याचा उद्योग चालवला. मल्हारच्या जिवालाही धोका होईल अशी जिवाईला भीति वाटली. म्हणून ती छोट्या मल्हारला घेऊन खानदेशातल्या नंदुरबारजवळ असणा-या तळोदे या गावी, आपल्या भावाकडे आश्रयास गेली. जिवाईचे भाऊ भोजराज बारगळ हे गांवचे अधिकारी होते. कंठाजी कदमबांडे यांच्या पदरी ते पन्नास घोडेस्वारांच्या पथकाचे नायक होते! त्यांनी जिवाई आणि मल्हारला आधार दिला.

| मल्हार आठ वर्षांचा झाला. तो रानात मेंढ्या चारायला नेई. एकदा एका झाडाखाली मल्हार झोपला होता. जिवाई दुपारी भाकरी घेऊन आली तेव्हा तिने एक अपूर्व दृष्य पाहिले. एक जातीवंत नाग आपल्या फणीचे छत्र, मल्हारच्या डोक्यावर धरून वेटोळे घालून बसला होता. जिवाई भीतीने अर्धमेली झाली. तिने आजुबाजूच्या लोकांना बोलावले. सर्वांनी ते दृष्य पाहिले. माणसांची गजबज ऐकून नाग शांतपणे निघून गेला. जिवाईला जो तो म्हणू लागला, “बाई ग, हा पोर फार भाग्यवंत निघणार आहे. हा राजा होईल.'' मल्हारच्या मामांनी त्यादिवसापासून त्याला रानात पाठवले नाही. घोड्यांवर देखरेख करण्याचे काम दिले. मल्हार घोडे राखण्यात पटाईत झाला. काही वर्षांनी जिवाई वारली; पण मामांनी भाचा मल्हार याचे शौर्य जाणले. त्याची शूराची निधडी छाती ओळखली आणि आपली कन्या गौतमाबाई हिचा विवाह मल्हारशी करून दिला. मल्हार मोठ्या शुभवेळेला घोड्यावर बसला. त्याने पुण्यापासून दिल्लीपर्यंत शौर्य गाजवले. पराक्रमाने मल्हारराव खरंच माळव्याचे राजे झाले. मेंढपाळाचे प्रजापाल झाले.

अहिल्येचा गृहप्रवेश

गौतमाबाई आणि मल्हार यांचा संसार सुरू झाला. मल्हाररावांचे शौर्य चारी दिशांना तळपत होते. त्यांना उसंत नव्हती. अनेक चढाया, युद्धे यातून त्यांच्या शौर्याच्या कथा पुढे येत होत्या. ।

गौतमाबाईंना पुत्र झाला आणि सगळीकडे आनंदीआनंद पसरला. त्याला आजोबांचे खंडेराव हेच नांव ठेवण्यात आले. खंडेराव हळूहळू मोठे होऊ लागले. त्याच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली. पण या मुलाची लक्षणे विपरीत होती. त्याला राज्यकारभार, लढाया, घोडे वगैरेमध्ये अजिबात रस नव्हता. तो अतिशय भांडकुदळ, उद्धट, तापट होता. तारुण्यात पदार्पण केल्यावर तर दुर्गुण अधिकच उसळू लागले. नशापाणी करण्याचं त्याला व्यसन लागले. त्याची राहाणी फारच डामडौलाची असे. आचारविचार मात्र हीन होते. साठमारी, कोंबड्यांची झुंज, शिकार असले खेळ त्यांना आवडत. त्यांचे शौर्य अशाप्रकारे वाया जात असलेले बघून मल्हारराव दु:ख, चितेत बुडून गेले होते. आपल्या पुत्राचे जीवन मार्गी कसे लागेल याची चिंता त्यांना लागली.

एकदा बाजीरावांबरोबर लढाईहून परत येतांना सैन्याचा तळ चौंडी गावातील सीना नदीच्या काठी पडला. नदीकाठी महादेवाचं देऊळ होतं. तिथे अहिल्या

आपल्या आईबरोबर दर्शनाला आली होती. मैत्रिणींबरोबर नदीकाठच्या वाळूत शिवलिंग तयार करत होती. शाळंकेवर वाळूचे लहान लहान गोळे ठेवून नक्षी काढत होती. तोच सैन्यातला घोडा उधळला. मैत्रिणी ओरडल्या ‘अहिल्ये, पळ. घोडा उधळला.' मैत्रिणी पळाल्या सुद्धा. पण अहिल्या? तिने आपले सर्व शरीर त्या पिंडीवर झाकले. भरधाव सुटलेला घोडा अहिल्येच्या बाजूने निघून गेला. त्याचवेळी मल्हारराव अन् बाजीराव धापा टाकत तिथे पोहोचले. तिला संतापाने खसकन् उभे करीत बाजीरावांनी ओरडून विचारले, “पोरी, इथे कां थांबलीस? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता तर?'' त्यावर मुळीच न घाबरता, आपले तेजस्वी डोळे बाजीरावांच्या डोळ्याला भिडवत ती म्हणाली, “जे आपण घडवावे ते जीवापाड, प्रसंगी जीव सांडूनही रक्षण करावे असंच सगळी वडील माणसे सांगतात. मी तेच केले. मी घडवलेल्या पिंडीचे रक्षण केले! माझे काही चुकले का?'' त्या तेजस्वी चिमुरडीचे शब्द ऐकून बाजीराव थक्क झाले. तिच्या डोळ्यात विलक्षण तेज होते. तिचा बाणेदारपणा बघून मल्हाररावही आनंदाने बघत राहिले. बाजीराव मल्हाररावांकडे वळत उत्स्फूर्तपणे म्हणाले, “मल्हारबा, या पोरीस तुमची सून करून घ्या. तिला राज्याच्या लायक करा. ही राज्य नांवारुपास आणेल. राज्याचं प्राणपणानं रक्षण करेल. हिचे डोळे रत्नासारखे तेजस्वी आहेत. तुमचा कुळपुत्र खंडेराव त्याला राज्याच्या लायक हीच करू शकेल. हिला सून करून घ्या आणि राज्यकारभाराच्या अनेक पदरांचं शिक्षण द्या."

बीड जिल्ह्यातील, जामखेड तालुक्यातलं चौडी हे एक लहान गांव, माणकोजी शिंदे आणि सुशीला या मातापित्यांच्या पोटी अहिल्येने जन्म घेतला. तिला दोन भाऊ होते. चौंडीची ही अहिल्या बघताच बाजीराव आणि मल्हाररावांनी तिच्या आईवडिलांची गाठ घेऊन अहिल्येला मागणी घातली. थाटात लग्नसमारंभ पार पडला. अहिल्या होळकरांची सून झाली. १७३३ मध्ये हा विवाह झाला आणि अहिल्या भाग्याची सोनपाऊले घेऊनच होळकरांच्या घरात आली. मल्हाररावांचे ऐश्वर्य वाढत चालले. अहिल्येच्या लग्नाबरोबरच तिचे शिक्षण सुरू झाले. | पेशवे यांची राजधानी पुणे इथे होती. परंतु त्यांचं काम मात्र उत्तर हिंदुस्थानातच बहराला आलं होतं. मल्हाररावांच्या मदतीने बाजीराव पेशवे उत्तर हिंदुस्थानातील सूत्रे हलवीत होते. अनेक लहानमोठ्या लढाया चालू होत्या. १७३० मधे माळव्यावर जे आक्रमण केले होते त्याचे सेनापतीपद मल्हाररावांकडेच होतेच. त्यावेळचे मोगल सरदार पळून गेले. २ ऑक्टोबर १७३० रोजी मल्हाररावांना माळव्यातील सर्व परगण्यांचा सर्व अधिकार मिळाला. नंतर महंमद बंगशनेही माळवा परत काबीज करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला मल्हाररावांच्या शौर्यापुढे हार पत्करावी लागली. आता माळव्यावर मराठ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी पेशव्यांनी जहागीरदारी आणि वतनदारीची प्रथा राबविली. आपल्या प्रमुख सरदारांना वतने दिली. याच प्रथेनुसार राणोजी शिदे यांना उज्जैन, आनंद पवार यांना धार आणि जिवाजी पवारास देवास मिळाले. त्यानंतर २० जानेवारी १७३४ रोजी पेशव्यांनी होळकरांना माळव्यात वंशपरंपरा चालणारी वतने, परगणे, इनाम दिले. मल्हाररावांचा खास गौरव करून होळकर राज्याची रीतसर स्थापना करण्यात आली. हे वैभव अहिल्यादेवींच्या पायगुणामुळे, त्यांच्यातील असामान्य कर्तृत्वामुळे प्रतिदिन वाढतच गेले. | लग्न झाले तेव्हा अहिल्या केवळ दहा वर्षांची होती. परंतु मल्हाररावांनी तिच्यातलं तेज, हुशारी जाणून, तिच्या शिक्षणासाठी गुरू नेमले. तिची बुद्धी प्रखर तेजस्विनी अहिल्याबाई होळकर होती. असा उल्लेख आहे की, दूध घटाघटा प्यावे त्याप्रमाणे ती ज्ञान पिवून टाकीत होती. गणित, वाचन याप्रमाणेच भूगोलाचं शिक्षणही त्यांना देण्यात येत होते. आपल्या गोड स्वभावाने आणि सेवावृत्तिने ती सर्वांची लाडकी झाली. मल्हाररावांना त्या काळच्या प्रथेप्रमाणे आणखी दोन बायका होत्या. बनाबाई आणि द्वारकाबाई. या तिन्ही सास्वांची उत्तम सेवा करीत असे अहिल्या. सगळ्यांचा प्रेमवर्षावही अहिल्येवर होई. मल्हारराव आणि गौतमाबाई आपल्या या सुनेची अपार काळजी घेत. अहिल्येच्या पायगुणाने वैभवाची कमान उंच उंच जात होती. तिची अभ्यासातली प्रगती चकित करणारी होती.

सात आठ वर्षातच ती केवळ एका नजरेने हिशोबातली चूक काढू लागली. चौदिशेस घोडासवारी करू लागली. जिल्हे, तालुके, वाटा, क्षेत्रे सर्व माहिती घेतली. रामायण, महाभारत वाचून संपलं. स्तोत्रे तोंडपाठ झाली. रोज फडनिशीत जावे, हिशोब बघावे, वसूल जमा बघावी, त्यासाठी माणसं पाठवावी, न्यायनिवाडे करावे, सरदारांना पत्रे पाठवावी, फौजा तयार ठेवाव्या, खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळे ठेवावे, खातेनिहाय पैशांचे वाटप करावे, गोळाबारुदा बाणभाते, ढालीतलवारी सज्ज राखाव्या, सास-यांच्या पत्राबरहुकूम सर्व रवाना करावे. मल्हारराव म्हणत. आम्ही तलवार गाजवतो ती सुनबाईच्या भरोशावर, मार्तंडांनेच हे रत्न आम्हास दिले. अवघी वीस बावीस वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली. इतिहासात याचे दाखले आहेत. | खंडेरावांची व्यसने वाढत होती. खंडेराव स्वतंत्र वाड्यात राहात. त्यांना आणखी बायका होत्या. त्या काळी ‘पतिव्रता' शब्दाचा इतका धाक होता की दुर्गुणी नवयालाही काही बोलणे हे धर्माविरुद्ध वर्तन समजले जाई. तरीही अहिल्याबाई शांतपणे खंडेरावांना रणविद्या शिकण्यासाठी प्रेरणा देत. युद्धावर जाण्यासाठी प्रोत्साहन देत. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नसे. त्यांना रेड्यांची झुंज, कोंबडाझुंज, शिकार यातच रुची होती. । १७४५ साली अहिल्याबाईंना पुत्र झाला. त्याचे नांव मालेराव ठेवण्यात आले. राज्यात सर्वत्र आनंदीआनंद झाला. परंतु मल्हाररावांना खंडेरावांच्या वागण्याची खंत वाटे. अहिल्येसारखे रत्न लाभूनही खंडेरावात काहीही फरक पडत नाही हे बघून त्यांना अपरंपार दु:ख होई. हळूहळू खंडेराव सुधारेल ही आशाही त्यांनी सोडून दिली. आता अहिल्याबाई हेच त्यांचं आशेचे एकमेव स्थान होते.

अहिल्याबाईंची हुशारी, बुद्धिमत्ता यांची पारख त्यांनी केली होती. होळकरांचे निशाण अहिल्यादेवीच उंचावर नेतील याची खात्री होती. ते अहिल्याबाईंना राजकारण, व्यवहार, देशाची स्थिती, सावधानता, गुप्तहेरांचं महत्त्व, पैशांची व्यवस्था, कारभारातले प्रश्न, खाचाखोचा सारं समजावून देत. अहिल्याबाईंची विलक्षण बुद्धी, हे सारे धडे पाठ करून टाकी. त्या दिवसेंदिवस समर्थ होत होत्या. | मल्हारराव सदैव लढायात गुंतलेले असत. दूरदूरच्या ठिकाणाहून मल्हाररावांची पत्रे येत. अहिल्याबाई पत्रातील आदेश तंतोतंत पाळून, त्यांची चोख व्यवस्था करीत. अहिल्याबाई मल्हाररावांबरोबर रणांगणावरही गेल्याचे इतिहासाने नमूद केले आहे. तिथेही त्यांनी धाडस, साहस आणि रणकौशल्य दाखवून सर्व कार्यात भाग घेतला होता. रणांगणाशी संबंध येणा-या प्रत्येक गोष्टींचे त्यांना ज्ञान होते. मल्हाररावांच्या आदेशाप्रमाणे काही ठिकाणी त्यांना स्वतः जाऊन कामे उरकावी लागत. राज्यकत्र्याने देशात फिरून भूगोल पाहिला पाहिजे, सामाजिक स्थितीचे ज्ञान करून घेतले पाहिजे असं मल्हारराव त्यांना नेहमी सांगत. एकदा एका महत्त्वाच्या व्यक्तिस काशीला जायचे होते. त्यांची व्यवस्था करण्याची विनंती बाजीराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना केली होती. अहिल्याबाईंनी त्यांची व्यवस्था केलीच आणि इंदौरपासून काशीपर्यंत वाटेत लागणारी गावे, नद्या, घाट वगैरे तपशीलाचा एक नकाशा स्वतः तयार केला. आपल्या ठिकठिकाणच्या अधिका-यांना पत्रे दिली. ।

आपल्या पराक्रमी सासरयाच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली, त्यांनी सर्व राज्यकारभार नावारूपास आणला. मालेरावांच्या पाठीवर अहिल्याबाईंना तीन वर्षांनी एक कन्यारत्न झाले. तिचे नाव मुक्ता असे ठेवण्यात आले.

सद्गुणांची खाण - अहिल्या

| हे अहिल्यादेवींचे चरित्र आहे आणि अशांचीच चरित्रे लिहिली जातात की ज्यांनी काहीतरी अलौकिक केलं आहे, जे सत्याला सामोरे गेलेत, ज्यांनी चोख न्याय केला, ज्यांनी दुर्बळांची पाठ राखली, ज्यांनी सत्ताधिशांना त्यांच्या चुका दाखवल्या, ज्यांनी इतरांचा पैसा विषसमान मानला. अहिल्याबाईंनी या सा-यासाठी आपल्या आयुष्याचा क्षणक्षण वेचला. त्यातल्याच काही ठळक गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. या कथा इतिहासात नमूद झालेल्या आहेत. त्यांच्या चरित्राचे मनमोहक रूप दाखवणाच्या आहेत.

| एकदा फडनिशीत हिशोब बघता बघता त्यांना पति खंडेरावांचे खाते दिसले. त्याचा वर्षाचा तनखा दोन महिन्यातच संपला होता. आता जर पति पैशांसाठी आले तर त्यांना नकार द्यावा लागणार होता. अन तो प्रसंग आलाच, नशापाणी केलेले खंडेराव अहिल्येसमोर उभे होते. अहिल्येने पैसे देण्यास नम्रपणे नकार देताच ते म्हणाले, ''मला पैसे हवेत, सल्ला तर मुळीच नको. हवेत ते पैसे अन् ते आम्ही नेणारच. बघुया तुम्ही आमचे काय करता ते!'' त्यावर अहिल्याबाई शांतपणे म्हणाल्या, “मी जे काय करावे ते दौलतीच्या, राज्याच्या हिताचे करावे, अशी मामंजींची आज्ञा आहे. आपल्या नांवे रुपये नाहीत. अर्थात आपली सेवा होऊ शकणार नाही.'' हे ऐकताच खंडेरावांनी अहिल्यादेवींसमोरची हिशोबाची वही घेतली अन् कोप-यात भिरकावली. अहिल्याबाईंच्या डोळ्यातून ठिणग्या उडू लागल्या. त्या संतापून कारभारी गंगोबातात्यांना म्हणाल्या, “तात्या, खतावणीची बेअब्रू करणा-याचा जबाब लिहून घ्या, अन् त्यांना पंचवीस मोहरांचा दंड ठोका. वसूल करून घ्या, आम्ही सुभेदारीत जातो." मागे वळूनही न पाहाता अहिल्याबाई तिथून निघून गेल्या. गंगोबातात्या थक्क झाले. 'असे तेज पाहिले नाही' असे शब्द त्यांच्या मुखातून निघून गेले. प्रत्यक्ष पतीलाही दंड ठोकून वसूल करणारी कठोर शिस्तीत राज्यकारभार राबवणारी अशी होती अहिल्या.

| एकदा अहिल्याबाई फडणिशीत गेल्या तोच सांडणीस्वार पत्र घेऊन आला. त्यात फार दुःखद वार्ता होती. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा नर्मदातिरी मृत्यू झाला होता बाजीरावांचे प्राण जाताच त्यांचा आवडता हत्ती आणि कुत्रा टाहो फोडत मरून गेले. सगळे राज्य शोकात बुडालं. मल्हारराव आले ते हृदय फुटल्याप्रमाणे रडत राहिले. बाजीरावांना परलोकी शांती लाभावी म्हणून ब्राह्मणांना दाने दिली गेली. वस्त्रे, मुद्रा यांचे दान, धर्मकार्ये यांच्यावर भरपूर खर्च झाला. काही दिवसांनी अहिल्याबाई हिशोब तपासायला बसल्या तेव्हा धर्मकार्याचा सर्व खर्च सरकारी खर्चात टाकलेला बघून चकित झाल्या. त्यांनी गंगोबातात्यांना हाक मारली. म्हणाल्या, ''तात्या, आपण थोर. बाजीराव श्रीमंतांच्या मुक्तिसाठी केलेल्या विधींचा खर्च आपण सरकारी तिजोरीवर टाकला? अहो काय म्हणावे याला?' गंगोबातात्या चाचरत म्हणाले, “बाईसाहेब, श्रीमंतांच्या पारलौकिक शांतीसाठी त्यांच्या सुभेदाराने केलेली कार्ये... म्हणजे ती सरकारीच नव्हे काय? मग ती खाजगी खर्चात कशी टाकावी?'' यावर तेजस्वी, निर्लोभी, अहिल्याबाई म्हणाल्या, "तात्या, मामजी काय फक्त सुभेदारच होते? अहो नाती काय फक्त रक्तातूनच येतात? काही नाती जिवाशिवाची, त्याची मोजमापे कशी घ्यावी? मामजी आठ दिवस अन्नाला शिवले नव्हते, बाजीराव मामंजींचे शपथबंधू होते. तात्या, हा सर्व खर्च खाजगी खर्चाकडे टाका. यापुढे ही गोष्ट खंबीरपणे पाहा. कुठल्याही प्रकारच्या खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीतून येता कामा नये, याची पक्की जरब ठेवा. खाजगीतून एखादे सरकारी काम झाले तर ते आम्हास चालेल पण खाजगी कामासाठी पैचा एक हिस्साही सरकारवर पडता कामा नये यासाठी पंचागे सावध रहावे." अहिल्याबाईंच्या स्वराला तिखट धार होती. त्यांचा धाक जबर होता. सोसायला जड होता. | एक दिवस एक विधवा स्त्री पहारेक-यांचे कडे तोडून थेट आत आली. सांगू लागली, “बाईसाहेब, मज अभागिनीस पुत्र नाही. सगळे नातलग आपापली पोरे घेऊन दारी ठाण मांडून बसले आहेत. हे पैशांसाठी मला विषही घालतील. मला यांची पोरे दत्तक नकोत. माझ्या दासीचा पुत्र मला दत्तक घ्यायचा आहे तर नातेवाईकांनी दंगा माजवला आहे. बाईसाहेब, नको मला ही संपत्ती. दान करू द्या मला आपल्या पायाशी. कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा आपल्या पायाशी राहीन तर प्रतिष्ठा पावेन. माझी संपत्ती, वाडा सारं सरकारात जमा करून घ्या!'' यावर अहिल्याबाई म्हणाल्या, 'मातोश्री, नातलगांच्या रेट्यासमोर हार न घेता, तुम्हास मान्य असेल त्यास दत्तक घ्या. माझ्या राज्यात विधवेला दत्तक घेता येईल!'' यावर गंगोबा तात्या हळूच अहिल्याबाईंना म्हणाले, “बाईसाहेब, अनायसे संपत्ती सरकारी तिजोरीत येते आहे. दत्तकाची परवानगी देणं म्हणजे आपलं नुकसान करून घेणं नाही का?' यावर आपला राग आवरत आवाज हलका करीत त्या म्हणाल्या, "तात्या, आपण काय हे बोलता? माळव्यातल्या विधवांना पतिच्या संपत्तीचा सुखाने उपभोग घेता यायला हवा. या विधवेच्या नातलगांना समज द्या. वाड्यावर सैनिक तैनात करा. तात्या, लक्षात ठेवा. स्त्रियांचा सन्मान हा माळव्याचा महालौकिक व्हायला हवा.'' मग त्या विधवेकडे वळत म्हणाल्या, 'मातोश्री, तुमच्या पसंतीचा दत्तक घ्या, दंगाफसादाची भाषा करणा-या नातलगांना समज दिली जाईल. समारंभात संकट येवू नये म्हणून, आमचे नजरबाज तिथे राहातील. यावर गंगोबातात्या म्हणाले, ''बाईसाहेब, दत्तकाचा नजराणा किती मागायचा?'' यावर संतापाने अहिल्याबाई म्हणाल्या, ''विधवेचा नेकबंद गुजारा व्हावी हे बघायचं की नजराणा मागायचा? अशा नजराण्याला दरोडा मानते मी तात्याबा! होळकरांचं राज्य प्रजेची सेवा करण्यासाठी आहे. दत्तकाला आमच्या खाजगीतून पोशाख द्या!''

प्रजेच्या सुखासाठी अहिल्याबाई जागरूक होत्या. विधवांचा, स्त्रियांचा छळ करणा-यांना क्षमा नव्हती. खाजगी खर्चाच्या पैचाही भार सरकारी तिजोरीवर पडू नये यासाठी त्या डोळ्यात तेल घालून दक्ष राहात. अशा होत्या अहिल्याबाई, मल्हारराव मोहिमात गुंतले होते. मल्हारराव अहिल्याबाईंना पत्रात लिहीत, सौ. अहिल्येप्रति मल्हाररावाचा आसीवाद, तुम्ही इंदौरस आहात तर आम्ही असल्याप्रमाणेच आहे. सात हजार फौजेच्या तयारीत असावे. जंबुरा-तोफा-गाडे यात कुचराई नको. शागिर्दाप्रति वर्तन दयाळू ठेवावे. प्रजेकडून रुपये येतात. त्यांच्या सुखसोई नेटक्या कराव्या. नादान गोष्टीचा संशय घेऊन माणूस खराब करू नये. कित्येक रुपये खर्चावे तेव्हा माणूस कामाचा होतो. इंदौरास येणे सध्या अशक्य-संदेशाप्रमाणे फौज तयार राखावी. सरदारांकडे निरोप ठेवून सारे सज्ज ठेवावे. या अशा पत्रातून मल्हारराव अहिल्येला कारभाराची समजही देत आणि शिकवणही! अशा पत्रांना अहिल्याबाई लगेच उत्तर लिहीत. “तीर्थरुप वडिलांप्रति अहिल्येचा साष्टांग दंडवत. आसीरवाद असो द्यावे. चूकभूल तर होणे आहेच. एकशेवीस जंबूरातोफा आणि बारुद पक्की सहा मण! सोबत तेज गोलंदाज, रोज दिडीने पण निशाणी पक्की. आम्ही परिक्षा करून घेतली आहे. भरणावसूल नेटका चालू आहे. आपल्या तलवारीस यशच आहे. आपल्या हुकूमाप्रमाणे शिकस्त करते. आपली आज्ञाधारक, सौ. अहिल्या-" | फडातील कारकून अहिल्येचे कसब, मुत्सद्देगिरी, कौशल्य, रणनीतीचे ज्ञान बघून चकित होत. मल्हाररावांचा उजवा हात म्हणजे अहिल्या. जे त्यांचा कुळपुत्र करू शकत नव्हता ते सारं काम अहिल्याबाई करत होत्या. परंतु अहिल्याबाईंचं निर्मळ प्रेम आणि विनम्र सेवा याचा परिणाम खंडेरावावर होऊ लागला. ते तलवारीकडे लक्ष देऊ लागले. कधी कधी मल्हाररावांबरोबर जाऊ लागले. अहिल्येला बरं वाटे, पण व्यसनांचा पाय पुढेच होता.

त्यावेळी लढाईत जे जडजवाहिर मिळे, लूट मिळे त्याचे वजन करून, त्याचा ठराविक हिस्सा पुणे दरबारी पाठवावा लागे. प्रत्येक लढाईनंतर ही कामे खूप असत. कुठे गुंजेचीही लपवालपव नाही की मोहरेची फसवणूक नाही. अहिल्याबाई स्वतः हे सारं बघत. हे काटेकोरपणे अमलात येई.

खंडेराव राजमहाल येथे लढाईस गेले. तिथे त्यांचा पराभव झाला. पण त्यांनी बरीच लूट आणली होती. ती सरकारात वजन न करता आपल्या वाड्यावर नेल्याचे कळताच अहिल्याबाई स्वतः तिथे गेल्या. तिथे लुटीचा ढीग होता. अहिल्याबाई शांतपणे म्हणाल्या, ''स्वामी, लूट परस्पर वाड्यात आणली? हा गुन्हा आहे. ही लूट आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर आणली आहे." यावर अहिल्याबाई म्हणाल्या, “स्वामी, जे सुभेदारी भोगतात त्यांची मनगटे रयतेसाठी असतात. आपण सुभेदारांचे वारस. चोरपेंढारी नव्हेत! नियतशाबूती हा राज्यकत्र्यांचा प्राण! प्राण गेल्यावर उरते ते प्रेत असते... फक्त प्रेत! स्वामी, ही लूट आधी फडणिशीत जमा करा. हिस्सेवारी पुणे दरबारी आणि इथल्या तिजोरीत जमा करा आणि उरलेल्याचा उपभोग घ्या! अन्यथा मला झडतीसाठी कारभारी पाठवावे लागतील." यावर खंडेराव म्हणाले, ठीक आहे. आपलं कुंकू पुसूनच झडतीला पाठवा!'' हे ऐकून अहिल्या अत्यंत दु:खी झाली पण खचली नाही. त्यांनी शांतपणे एक चादर घेतली. त्यात सारी लूट बांधू लागल्या. खंडेरावांची त्यांना अडवायची हिंमत होत नव्हती. असे लोकोत्तर गुण अहिल्याबाईत होते. माणसांची चरित्रे अशा घटनांनी गुंफली जातात. चरित्रे म्हणजे केवळ सनावळी नव्हे. किंवा केवळ घटना नव्हे. सत्यासाठी नव-यावरही झडती काढू शःणारी ही स्त्री म्हणजे सामथ्र्याची मूर्तिमंत पुतळी होती. सत्यमूर्ति तेजशलाका होती.

राजमहालची लढाई, पराभव आणि लूट या प्रसंगांनी शिदे, होळकर यांच्यातले वितुष्ट वाढीला लागले. वर्षेच्या वर्षे गेली. मालेराव आठ वर्षांचे अन मुक्ता पांच वर्षांची झाली. खंडेराव कुठेही कर्ते होत नव्हते. पण मालेरावही आजोबा मल्हाररावांसारखे न होता वडिलांच्याच वळणावर जात होते. अहिल्याबाईंना सर्वात मोठे दु:ख हे होते. मालेरावाला अभ्यासात गति नव्हती. पंतोजीस तो आटोपत नसे. खेळही असेच क्रूर असत. विंचू मार, बेटकुळ्यांच्या पायांना दोच्या बांध, फुलपाखरांना सुया टोचाव्या, गाढवावर बसावें, कुत्र्यामांजराचे प्राण घ्यावे, झुरळे-उंदीर पकडावे, मांजरापुढे टाकावे, मांजराने ते मटकावले की टाळ्या पिटाव्या. अहिल्याबाई मुलाचे हे चाळे बघून धसकून जात. त्या पहाटे उठत. मालेरावास शिकवायला बसत. त्याला शौर्याच्या कथा सांगत. पण त्याचं लक्ष भितीवरच्या पालींकडे, किड्यांकडे असायचं. तो रोज नव्या नव्या खोड्या करी. कधी फुलांच्या करंडीत उंदीर भर, कुंकवाच्या डबीत तिखट भरून ठेव, ब्राह्मणांच्या जोड्यात विंचू घालून ठेव, पाण्याच्या तांब्यात मीठ टाकून ठेव आणि इतरांची फजिती झाली की पोट धरधरून हसत. हसता हसता लोळू लागत. एकदा तर झाडाला बांधलेल्या झोपाळ्यांच्या दोच्या झाडावर चढून सैल करून ठेवल्या, मुक्तेच्या मैत्रिणी झोका घेतांना पडल्यावर, मालेरावाची हसून मुरकुंडी वळली. अहिल्याबाईंना याचं अपार दु:ख होई. त्या मार्तडाजवळ एकच मागणं मागत की या मालेरावाला सुबुद्धि दे.

कभेरीचा वेढा



 १७५४ साली मल्हारराव अजमेर येथे गेले. त्यांनी चौथाई वसूल करण्याचा प्रयत्न केला. पण जाट ऐकेना. जाटांनी भांडण उकरले. आधीपासूनच कुरबुरी चालू होत्याच. मल्हारराव इंदौरला येताच रघुनाथरावांचा खलिता आला. त्यांनी लिहिले । होते की, “आम्ही अजमेर प्रांती जाऊन राजपुतान्याची खंडणी वसूल करतो. आमचेकडे खंडेरावास बिनीची फौज देऊन पाठवणे. दत्ताजी शिदेही येत आहेत. आपण भरतपुर मुक्कामी तमाम फौजेसह एकत्र यावे. आम्हास तर बाजीराव पेशव्यांनी फौजेनिमित्त केलेली कर्जे निवारणे हेच एक उदंड काम झाले आहे. आपल्यासारख्या ज्येष्ठ स्तंभांवरच राज्याचा भार आहे. काही चुकले असल्यास, क्षमा करावी. कृपा कीजे!'' पत्र वाचून मल्हारराव अहिल्याबाईंना म्हणाले, ‘‘खंडेरावांना पुढे पाठवतो. आम्ही लगोलग निघतोच!'' याप्रमाणे धावपळ सुरू होऊन फौजा कुंभेरीकडे रवाना झाल्या. संक्रांतीचा सण करून बायकाही जाणार होत्या. यावेळेस खंडेरावांनीच तशी आज्ञा केली होती. त्यांच्या दोन मुसलमान बायकांनाही सोबत घ्यावे लागले. अहिल्याबाई, गौतमाबाई, शबनम, सकीना, सगळे कुंभेरीस आले. मल्हारराव, रघुनाथराव, शिदे, सरदार सेनापती यांच्या राहुट्या जवळजवळ होत्या. फक्त खंडेराव शबनम व सकीनासह वेगळ्या राहटीत राहात. अहिल्याबाई, गौतमाबाई एकत्र होत्या. अहिल्याबाईंनी पहाटेच पूजा करावी. सवांना अंगारा लावावा. मग मुदपाकखान्याकडे बघावे. जखमींना उपचार करावे, शस्त्रास्त्रांची व्यवस्था करवून घ्यावी. दिवसभर तोफखाना संभाळावा, सगळीकडे जातीने लक्ष ठेवावे. खणखणी, घोड्यांचे खिकाळणे, माणसांच्या किंकाळ्या, रक्ताच्या चिळकांड्या! असाही दीड महिना संपला. तडजोड व्हायची चिन्हे दिसेनात. कुणी किल्ल्यातून बाहेर येईना की आत जाईना. सगळे आपल्या जागी घट्ट होते.

त्या दिवशी अहिल्याबाई अंगारा घेऊन खंडेरावांच्या राहुटीत गेल्या खंडेराव नशेत चूर होते. अहिल्याबाईंनी संतापाने दारुचे बुधले, अफूचे गाळावे चुलीत ओतले. सकीना शबनमला म्हणाल्या, “मेल्यांनो, स्वामींना दासत बुडवता? ही तुमची सेवा? खंडेरावांना जागे करत त्या म्हणाल्या, “स्वामी, हे छावणीचे ठिकाण पंचेद्रिये सावध राहायची वेळ! बुद्धिचा होश सुटेल असे करू नये." हे ऐकताच ताडकन उठत खंडेराव म्हणाले, “कोण म्हणतो बेहोश? आत्ता, या क्षणीसुद्धा रणांगणातल्या तोफेपर्यंत जायची हिंमत आहे आमची. ही छाती शूराची आहे नामर्दाची नाही." आणि अहिल्याबाई नको नको म्हणत असतांनाही ते ऐकेनात. अहिल्याबाई म्हणाल्या, “स्वामी, असे धाडस युद्धात करू नये. कुणी निशाणीवर टपून असेल, हत्यार सरसावून असेल..." पण त्यांचे वाक्य तोंडातच राहिले. खंडेराव निशाण मोर्चाकडे धावत सुटले. तोच कुंभेरगडाहून तोफेचा गोळा सुसाट वेगाने आला. प्रलयी वीज पडावी तसा खंडेरावांच्या देहावर पडला. खंडेराव कोसळले. अहिल्याबाईंच्या किंकाळ्या राहुट्या कापीत गेल्या. मल्हारराव धावत खंडेरावाच्या प्रेताजवळ गेले. त्याला कुरवाळत म्हणाले, "अरे जाटा, माझ्या या कोकराने तुझे काय केले होते? युद्धनीती मोडून तू भर थाळ्याच्या वेळी त्याला मारले. मी तुझा बदला घेईन.'' अहिल्याबाई बेशुद्ध होत्या. अहिल्याबाईंचा अनावर शोक बघून मल्हारराव घाबरून गेले. सगळे सरदार, ‘खंडेरावाचा अंत्यविधी करायला हवा' असं सांगून मल्हाररावांना सावध करत होते. खंडेरावांच्या नऊ बायकांना इंदौरहून आणण्यात आले. त्या सगळ्याजणी सतीवस्त्रे नेसून उभ्या होत्या. अहिल्याबाईंनीही सती जायचा निर्धार जाहीर केला. त्याही सतीवस्त्रे नेसून, मळवट भरून उभ्या राहाताच मल्हाररावांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. ते अहिल्याबाईंच्या पुढे डोई घासत म्हणाले, “मुली, खंडूच्या या अपमृत्यूमुळे मी निर्जीव झालो. आता तूही मला सोडून जाणार? मुली, आता माझा पुत्र होण्याचे सोडून कुठे निघालीस?'' पुत्राचा अपमृत्यू बघायची दुर्दैवी वेळ तर त्यांच्यावर आलीच होती परंतु कर्तबगार अशा सुनेनं सती जायची तयारी केलेली बघून त्यांच्या हृदयाचा ठाव सुटला. अहिल्याबाईंना राज्यकारभाराचे सर्व पदर त्यांनी शिकवले ते तिला पुत्राच्या जागी मानूनच शिकवले. त्या तेजस्वी स्त्रीने हा सारा राज्यकारभार, त्यातल्या खाचाखोचा, तडफदारपणे शिकून घेतल्या. अहिल्याबाई कुटुंबाच्या आणि राज्याच्याही आधारस्तंभ झाल्या होत्या. हा आधारच आता कोसळणार होता. मल्हारराव दुःखाने खचून गेले. जीवनभर अनेक संकटांना धैर्याने तोंड देणारा हा महापराक्रमी रणशूर मुत्सद्दी अहिल्याबाईंच्या पायाशी कोसळून विलाप करीत होता. "मला अनाथ करून जाऊ नकोस पोरी, तूच माझा खंडू

आहेस. तू गेलीस तर मी निपुत्रिक होईन. हे राज्य आता तुझेच आहे. जीव द्यायचाच तर या प्रजेसाठी दे. या प्रजेची आई हो. तुझ्याकडे बघून मी माझं दुःख विसरेन- पण तू गेलीस तर मी जिवंत राहाणार नाही. मुली, कष्टाने मिळवलेल्या या राज्याचा, या प्रजेचा विचार कर." तेथे उभे असलेल्या नातलगांनी मल्हाररावांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला. अहिल्याबाई म्हणाल्या, “मामंजी, पतिव्रतेने सतीच जायचे असते ना? मी सती गेले नाही तर माझ्या धर्माची चेष्टा होईल, माझी अपकीर्ति होईल, मला सती जाऊ द्या!”

‘पोरी, हे राज्य तुझ्या मदतीने नांवारुपास आले. आपण जे घडवावे ते प्राणपणाने रक्षावे हे तुझंच वाक्य! माझं पुण्य संपलं का पोरी?'' मल्हारराव ढसढसा रडू लागले. तोवर गौतमाबाईंनी अहिल्येला मिठी घातली. म्हणाल्या, “अग, तू माय आहेस या घराची! या झेंड्याची लाज राख! भीक घाल या म्हाता-यांच्या पदरात!'' इकडे चिता रचली गेली. खंडेरावांचं प्रेत ठेवलं गेलं. त्यांच्या नऊ बायका चितेकडे निघाल्या. अहिल्येने सर्वांच्या पायावर डोकं ठेवलं. हात जोडले म्हणाली, ‘‘स्वामी, माझ्या निष्ठेची शपथ, आजपासून सारे अलंकार, रंग, उपभोग या चितेत टाकते. आजपासून फक्त शुभ्र वस्त्र नेसेन. यापुढील आयुष्य प्रजेसाठी, राज्यासाठी!'' अहिल्याबाईंनी सर्व अलंकार शेल्यात बांधून चितेवर ठेवले. चिता धडधडून पेटली. सगळा आसमंत सतीच्या किंकाळ्यांनी भरून गेला. डेप्यात आल्यावर मल्हारराव म्हणाले, “आजपासून तुम्ही आम्हाला पुत्राच्या जागी, यापुढे तुम्हाला एकेरी हाकारणे नाही. आमच्या वस्तीला वणवा लागला. वीज कोसळली. पण तुमच्यासारखे एक अनमोल रत्न आम्ही वाचवले. तुमच्या पतिव्रताधर्माच्या आड आलो, त्याचा जबाब ईश्वराच्या दरबारात देऊ आम्ही!" यानंतर अहिल्याबाईंनी सारे सुखोपभोग, रंगीत वस्त्र वज्र्य केली आणि मल्हाररावांनी अहिल्याबाईंना बहुमानार्थी संबोधने वापरायला सुरवात केली.

कारभार

पेशवे सरकारने खंडेरावाच्या उत्तरक्रियेसाठी दहा हजार रुपये मंजूर केले. सूरजमल जाटानेही, मल्हाररावांच्या रागाला, प्रतिज्ञेला घाबरून पंधरा हजाराची गावे दिली. अहिल्याबाईंनी कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्री उभारली आणि जाटाने दिलेल्या पंधरा गावांचे उत्पन्न त्या छत्रीच्या खर्चासाठी बहाल करून टाकले. मल्हारराव तर खचून गेले होते. देशात सर्वत्र पुन्हा अशांतता माजू लागली. त्यांना स्वस्थ बसणे शक्य नव्हते. मल्हारराव जाटाविरुद्ध झुंज घेत होते तर रघुनाथराव साठ लाख घेऊन जाटाशी तह करण्याचे मनसुबे करत होते. वर्ष असंच सरलं. वर्षश्राद्धासाठी आलेले लोक अहिल्याबाईंच्या सती न जाण्याची चर्चा करीत राहिले. त्यावेळी मात्र मल्हाररावांनी रुद्रावतार धारण केला. म्हणाले, “अहिल्याबाईंना आम्ही सती जाऊ दिलं नाही. यापुढे याविषयी कुणी शब्दही बोलाल तर, जिभेसकट त्या माणसालाच आग लावून टाकेन." मल्हारराव आणि गौतमाबाई समर्थपणे अहिल्याबाईंच्या पाठीशी उभे राहिले. | अहिल्याबाई कामकाज बघू लागल्या. पांढ-या घोंगडीवर शुभ्रवस्त्रे नेसून अलंकारविरहित अशा अहिल्याबाईंना बघून, माणसं कासावीस झाली. मल्हारराव पुन्हा मोहिमा गाजवू लागले. सायनूरची लढाई झाली. दहालक्षाचा मुलूख काबीज केला. अहिल्याबाई इंदौरातून पत्राबरहुकूम सारी व्यवस्था करीत होत्याच. | त्याचवेळी नजरबाजांकडून भिल्लांच्या उपद्रवाच्या बातम्या येत होत्या. भिल्ल यात्रेकरूंवर हल्ले करीत. त्यांची लूट करीत. या लुटीला सरंजामदारांची साथ आहे. ते लुटीतला हिस्सा घेतात, हे कळलं अन् अहिल्याबाई संतापून उठल्या. त्यांनी सर्व सरदारांना पत्रे लिहिली. लिहिले की, “सर्व सरंजामदारांना ताकीद देण्यात येते की, कुणाचाही भिल्लांशी संबंध आहे असे कळले तर सरंजामी रद्द करण्यात येईल. मग सबबी ऐकल्या जाणार नाहीत. वाटा वाटांवर गस्ती फौज ठेवा. सहास्वारांचं पथक असावं. त्यांचे काम एकच, वाटसरूंना पुढील गस्ती फौजेच्या स्वाधीन करावं त्यांनी पुढच्या गस्तीपथकापर्यंत यात्रेकरूंना संरक्षण द्यावं. तशी नाकी आणि ठाणी बांधून घ्या!
इतकेच करून दूरदर्शी अहिल्याबाई थांबल्या नाहीत तर त्यांनी राज्यात जाहीर केले की, “जो भिल्लांचा उपद्रव नाहिसा करेल त्याच्याशी कन्या मुक्ता हिचा विवाह करून देण्यात येईल!'' त्या काळात हे केवढे धारिष्ट्य होते याची

आज कल्पनाही येणार नाही. मालेराव तर दुर्गुणीच होता, निदान जावई शूर मिळावा आणि भिल्लांचा उपद्रवही थांबावा या दुहेरी हेतूने केलेली ही योजना म्हणजे अहिल्याबाईंच्या तेजाची एक शलाकाच होती. त्या म्हणत, “ज्या मातीत धार्मिक यात्रेकरूस वा सामान्य प्रवाशास लुटारूस तनधन देणे पडते, त्या मातीचा दुलौकिक चारही दिशा जाणार. दगाबाज भिल्लांचा पुरता बीमोड करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.' | दरम्यान मल्हारराव आले ते मालेरावांची सोयरीक ठरवूनच! बहाड़ घराण्यातल्या मैना नांवाच्या मुलीशी मालेरावांचा विवाह ठरणार होता. या वार्तेने अहिल्याबाईंना मुळीच आनंद झाला नाही. बहाडांच्या घरची मंडळी मैनेस घेऊन आली. अहिल्याबाईंनी मैनेच्या आईवडिलांना एकांतात बोलावले आणि स्पष्ट सांगितले की, “आपली कन्या चंद्राचे बिंब. पण माझ्या काही उणीवा स्पष्ट करणे माझ्या दैवी आहे. देणेघेणे म्हणाल तर सुतळीच्या तोड्याचीही अपेक्षा नाही, पण बेलभांडार हाती घेऊन सांगते की, मालेराव फार व्रात्य, टवाळ, चहाडखोर आहेत. आम्हाला जुमानित नाहीत. घुटीची गोळी घेऊन नशा करतात, रागाचे आहारी जाऊन चाबूक उठवतात. ब्राह्मणांचे पाठी विचूसाप सोडतात. अवघा क्रूरपणा! मातृप्रेमास मात्र तिला इथे उणे नाही!'' आपल्या मुलाच्या दुर्गुणांचा पाढा त्याच्या भावी सासुसास-यांपुढे वाचण्याची हिंमत त्यांच्यात होती. सत्यप्रियता हा त्यांच्या देहाचा जणु कणाच होता. मालेरावचे लग्न मैनाशी झाले त्याचवेळी मुक्ताच्या लग्नाचा 'पण' कानोकानी गेला. | अहिल्याबाईंना शांतता नव्हती. अबदाली सरहिंदवरून निघाल्याची वार्ता, लाहोरची लुटालूट हे सारं ऐकून त्या अस्वस्थ होत्या. अबदालीने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या. यमुना लाल झाली. अहिल्याबाईंनी जाणले की हिदुना चिरेबंद आश्रयस्थाने हवीत. त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या. मल्हाररावांनी बरीच लूट मिळवली असे नजरबाजांकडून कळल्यावर अहिल्याबाई फारच संतापल्या. तोच एक निनावी पत्र आले. त्यात लिहिले होते की, “मल्हारराव जर दिल्लीत ठासून बसले असते तर अवघे मार्गी लागले असते. पण द्रव्यलोभाने हे दक्षिणेत गेले. खंडणी आणि लूट इतकीच कामे. अंतर्वेद, कुंजपुरा, कुरुक्षेत्र, नजिबखान सारख्या सर्पाच्या स्वाधीन केले. हे कृत्य मराठ्यांच्या नाशास कारण होणार. मातोश्री, मल्हारबांची आता साठी आली. बुद्धि नाठी झाली. त्यांना आवरा. आपली खाजगी संपत्ती दूषित झाली आहे. कळावे. आपला विश्वासू पुत्र!''

भाद्रपदात सुभेदार आले. भरपूर द्रव्य घेऊन आले. अहिल्याबाईंना त्या द्रव्याचा तिळमात्र आनंद नव्हता. पेशव्यांना बरेच कर्ज झाल्याचे कळाल्यापासून तर त्यांना चैन नव्हतं. श्रीमंत पेशव्यांचे सरदार करोडोपती होतात आणि श्रीमंत पेशवे कर्जबाजारी होतात हे घडतंच कसं? धणियास पदर पसरावा लागत असेल तर, रुपयांची नदी कुणाच्यातरी खाजगी संपत्तीत शिरते याची त्यांना खात्री होती. गेल्या दोन वर्षात हिस्सेवारी नीट दाखवली गेली नाही याची जाणीव त्यांनी स्पष्ट शब्दात मल्हाररावांना दिली. अपकीर्तपक्षा मरण बरे, हरामाचा पैसा अन फुकटची तनसडी नसावी. व्यक्तिगत स्वार्थापिक्षा देश मोठा, ही माती मोठी हे पुन्हा पुन्हा सांगितले. ही सारी शिकवण आपणच मला दिली अन् एकाएकी आपण द्रव्याच्या मागे का लागलात? असा खडा सवाल अहिल्याबाईंनी केला. आपण चोरपेंढारी नसून पेशव्यांचे सुभेदार आहात याची जाणीव करून दिली आणि पेशव्यांचे कर्ज फेडणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगून द्रव्य घेऊन त्यांना पुणे मुक्कामी रवाना केले. अहिल्याबाईच्या समजदारीला तोड नव्हती. इतिहासात त्यांच्या चातुर्याचे, दूरदृष्टीचे अनेक दाखले आहेत. अहिल्याबाई म्हणजे सद्गुणांचे भांडार होत्या. या साच्या कथांना इतिहासात आधार आहे. | अहिल्याबाईंनी इंदूरात तोफांचा कारखाना उघडला. त्या स्वतः तिथे जात. हस्तनाला, जेजाला, मिलाप, सुरतनाला, सुरुंग यातला फरक त्यांना माहित होता. बत्तीबस, गाडे, गोळ्या यांच्यावर त्या स्वत: नजर ठेवीत. आजच्या पिढीला त्यांची

ओळख एक धार्मिक स्त्री इतकीच आहे. म्हणूनच अहिल्याबाईंचे हे सर्व गुण वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी हे अनेक दाखले दिले. ही सारी कल्पित रचना नसून इतिहासात याचे दाखले पुरावे पानोपानी आहेत. आणि
हा आला है .

गानिपतचा संग्राम

हे अहिल्याबाईंच चरित्र असल्यामुळे पानिपतच्या संग्रामाची हकीगत अहिल्याबाईंच्या संबंधापुरती मर्यादित राखली आहे. पुणे मुक्कामी जाऊन मल्हाररावांनी कर्जफेड केली. त्यानंतर ते लढाईतच गुंतले. त्यांचं वय आता झाले होते. अड़सष्टावं वर्ष लागले. अहिल्याबाईंना मल्हाररावांच्या प्रकृतीची चिंता वाटे, त्यांचं कशातच लक्ष लागत नसे. तोफांच्या कारखान्याचे काम जोरात चालू होतं. पुणे येथून भाऊसाहेब, विश्वासराव सैन्यासह उत्तरेकडे आल्याचे कळले. मल्हाररावांच्या पत्राप्रमाणे अहिल्याबाई तोफखाना घेऊन ग्वाल्हेर येथे गेल्या. पानीपतची रसद तुटली होती. अन्नपाणी मिळत नव्हतं. घोड्यांना चंदी नव्हती. अशातच १७६१ सालची संक्रांत आली. पानिपतावर भीषण संग्राम झाला. विश्वासरावासह अनेक योध्दे मारले गेले. भाऊसाहेब नाहिसे झाले. लाख माणसं मेली. अनेक घाव लागलेले मल्हारराव, भाऊसाहेबांच्या पत्नी पार्वतीबाई, गौतमाबाई सारे ग्वाल्हेरला भेटले. पानिपत युद्धाच्या वार्ता, विजेसारख्या अंगावर कोसळल्या. मल्हारराव तशाच अवस्थेत सर्वांना सुखरुप पोचवण्यासाठी निघाले. अहिल्याबाई इंदौरला आल्या. वाडा जखमी सैनिकांनी भरला होता. अन्न अन्न, पाणी पाणी करत सैनिक कोसळत होते. निराधार, जखमी, अखेरचा श्वास घेणारे! युद्धाने झालेले ते भयंकर नुकसान बघून, अहिल्याबाईंचा थरकाप झाला. त्यांनी लगेच सेवापथके उभारली. वाड्याच्या खोल्या खोल्यातून, सैनिकांवर उपचार चालू झाले. इंदौरातील सगळे वैद्य उपचार करीत होते. मोठमोठ्या कढयातून सांजा तयार झाला. सर्वांना पोटभर खायला दिले गेले. पंचवीस चुली पेटल्या. हजारो माणसे राबत होती. अहिल्याबाई सगळीकडे फिरून लोकांना धीर देत होत्या. त्यांच्या चरित्रात अशा अनेक उदात्त गोष्टी आहेत की ज्या वाचकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. त्यांची खरी ओळख सर्वांना व्हायला हवी. अहिल्याबाई म्हणजे एक चालती बोलती माणुसकीची गाथा होती.

मल्हाररावांचा मृत्य

| पानिपतच्या अपयशाचा डाग धुवून काढण्यासाठी मल्हारराव सतत मोहिमांवर जाऊ लागले. पाच वर्षात त्यांनी उत्तरेकडची घडी बसवली. कामकाज, वसूली वेळच्यावेळी होऊ लागली. अहिल्याबाई इंदौरचा कारभार दक्षतेने पाहात होत्या. पानिपतचे सैन्य पाणी पाणी करत मेले. हे अहिल्याबाईंनी लक्षात ठेवून ठिकठिकाणी विहिरी खोदून घेतल्या. दंगाफसादाच्या वेळी आश्रयस्थाने हवीत म्हणून धर्मशाळा बांधून घेतल्या. अहिल्याबाईंचे धार्मिक कार्यही असे समाजकार्याशी जोडलेले होते. पारलौकिक सुखासाठी नव्हे तर माणसांसाठी त्या धर्मकार्ये करीत होत्या. कामात व्यग्र असतांनाच गौतमाबाईंचा मृत्यू त्यांना पोरके करून गेला. मल्हाररावांच्या मस्तकी गोळा लागला होता. तेव्हापासून त्यांच्या कानात सतत कळा येत. तरी मंगळूर, औरंगाबाद, राक्षसभुवन इथल्या चढाईचे काम मल्हाररावांनी फत्ते केले. पुणे दरबारी माधवराव आणि चुलते रघुनाथराव यांच्यातील भांडणे विकोपाला गेली होती. अहिल्याबाई म्हणत, “या भांडणात फिरंग्यांचे फावते एवढे कोणास कळू नये? यांच्या बुद्धीवर इतका बुरसा कसा आला आहे?" अधुनमधून मल्हाररावांची पत्रे येत. त्यातील काही पत्रे वाचकांसाठी मुद्दाम देत आहे. अहिल्यादेवींची थोर योग्यता पटवून देणारी ही पत्रे आहेत.

चिरंजीव अहिल्याबाईंना मल्हारजी होळकर यांचा आशीर्वाद; तुमचे पत्र मिळाले. समाचार अवगत झाला. ग्वाल्हेरमधे तोफखाना ठेवल्यास चारापाण्याची अव्यवस्था होईल, त्यामुळे तो सिरोज येथे घेऊन जात आहे' असे तुम्ही लिहिले आहे. तोफखाना सिरोजमधे ठेवून, तेथे बैलांच्या चारापाण्याची उत्तम व्यवस्था करून, तानूला तोफखान्याबरोबर तेथेच राहू द्यावे व तुम्ही इंदौरला जावे. तेथे पोचल्यावर सेंधवा परगण्याची वसूली आणि ताजपूरचा बंदोबस्त जरूर करावा. येथील परिस्थिती तुम्हास लिहून कळवली आहेच, मी आता दिल्लीहून रवाना झालो आहे. अंतरवेदच्या मार्गाने बुंदेलखंडाजवळ पोचेन. पुढे जसा विचार होईल तसे करण्यात येईल. छ२ रमजान, छ१३, सन ११७४ फाल्गुन मास.
चि, अहिल्याबाईंना आसीरवाद, गोहदकरकडे गढीचा जमाव आहे काय? त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून तोफखाना पाठवावा. एकदम साहस करू नये. आपला प्रभाव टाकून जेवढे काम होईल तेवढे करून घ्यावे. दुस-याच्या भरोशावर तोफखाना फार दूर पाठवू नये. तोफखान्याची इभ्रत राहील व आपलेही काम होईल, मतलब सिद्ध होईल, अशा युक्तिचा विचार करीत राहावे. ६-११, रमजान, आशीर्वाद,

चि. अहिल्याबाईंना मल्हारजी होळकर यांचा आशीर्वाद; येथील समाचार तुम्हाला यापूर्वीच कळवला आहे. त्यावरून तुम्हाला येथील परिस्थिती माहित झालीच असेल. ताजी माहिती अशी की, आम्ही दिल्लीहून रवाना होऊन अनूप शहराजवळील कर्णवास गावी ६-११ रमजानला आलो आहोत. येथे होळीचा सण होईल. गिलच्यांच्या झगड्यात नजीब सामील आहे. अबदाली सरहिंदकडे

आल्याची अफवा पसरली आहे. त्याच्याकडे नजीबखानास पाठवले आहे. तिकडील पूर्ण खबर आल्यावर पुढचा विचार केला जाईल. निश्चित खबर येईपर्यंत, गंगाकिनारी मुक्काम राहील. पूर्ण माहिती मिळाल्यावर, सकूराबादहून यावे लागेल. देवा नांवाच्या दूताकडून जे पत्र तुम्हाला पाठवले आहे ते मिळालेच असेल. त्यानुसार रवानगीची व्यवस्था करावी. बरोबर भरवशाचा माणूस नसल्यामुळे रवानगी केली नसल्यास इकडे कुणाला पाठवू नये, तुम्ही ग्वाल्हेरलाच राहावे. आम्हीही लौकरच प्रांतात येत आहोत. तिकडे आल्यावर, आवश्यकता वाटल्यास तुम्हाला बोलावून घेऊ, तुम्ही गोहदवाल्यांचा एक किल्ला तोफ डागून खाली करवून घेतला अशी दूताने आम्हास खबर दिली आहे. म्हणून तुम्ही ग्वाल्हेरासच राहावे आणि तोफा व जम्बूरीच्या गोळ्यांचा कारखाना सुरू करून लढाईची संपूर्ण सामग्री एकत्रित करावी. आम्हाला गोहदवाल्यांना हरविणे आवश्यक आहे. तुमच्या पसंतीचे उत्तम सामान असल्यास विश्वासपात्र माणसाबरोबर रसद पाठवावी. अथवा तेथेच असू द्यावी. ता. ६-११ रमजान, पौ. ६-२३ रमजान सुभखैयास सितैन सन ११७४.

| चि, अहिल्याबाईंना मल्हारजी होळकरांचा आशीर्वाद; तुमच्याकडील वर्तमान कळवीत असावे. रसद पाठविण्यासंबंधी एकदोन पत्रे पूर्वी पाठवली होती. तुमचा सर्वांचा विचार येथे येण्याचा आहे असे आम्ही ऐकले आहे. आमची इच्छा काय आहे ते तुम्हास माहितच आहे. अशा परिस्थितीत परवानगीशिवाय येथे येणे कितपत ठीक असेल? आमच्या आज्ञेची आवश्यकता असेल तर जसे आम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे राजेश्री बहेरी आनंद अथवा राजेश्री गोविंद शामराव यांचेबरोबर रसद पाठवून तुम्ही तोफखान्यासह त्वरित सिरोंजला रवाना व्हावे. चिरंजीव मालेराव वगैरे कोणी आल्यास त्याचा उपयोग होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून जसे लिहिले आहे तसे करावे. अबदाली सरहिंदकडे आला आहे. सुजाउद्दौला व सर्व रोहिले एकत्र झाले आहेत. गिलची दिल्लीस येणार आहे. पुढे जसा अवसर मिळेल त्याप्रमाणे करण्यात येईल. तुम्ही घडीचाही विलंब न लावता तोफखाना घेऊन सिरोंजला जावे. वाटेत कोठेही थांबू नये. लिहिल्याप्रमाणे वाटेवरच्या मार्गाने रसद रवाना करावी. पी. ६-१३, ११७४ पारनदी, फाल्गुन मास.

| चि, अहिल्याबाईंना मल्हारजी होळकरांचा आशीर्वाद, येथे कुशल आहे. तुमच्याकडील वर्तमान लिहून कळवावे. तानू तुमच्याजवळ तोफखाना घेऊन आला

आहे. तोफखाना सिरोंज येथे ठेवून, चारापाण्याची व्यवस्था करून पुढे जावे. रा. चिमणाजी गोविंद मामलेदारास बैलांसाठी चायाची व्यवस्था व तोफखान्याची दुरुस्ती करण्यास ताकीद करून, तोफांची तयारी करून ठेवावी. यासंबंधी असावधानी नसावी. त्या प्रांतात आम्ही लौकरच येत आहोत. तेथे आल्यावर तोफांची जरूरी लागेल. ज्यावेळी पत्र पोचेल त्यावेळी तयारी असली पाहिजे. त्यासाठी कळ, दोर वगैरे सर्व सामान तयार ठेवावे. बैलांना सशक्त करून ठेवावे. तोफखान्याच्या तयारीसंबंधी तानूने लिहिले आहेच. तुम्हीही ताकीद करून बैलांची वगैरे उत्तम व्यवस्था करवून घ्यावी. ६-२ रमजान, अधिक काय लिहावे?

(ही पत्रे इंदुरहून निघणारया ‘मल्हारी मार्तड'च्या १६ ऑगस्ट १९१७ च्या । अंकात प्रसिद्ध झाली होती.) | या पत्रांवरून मल्हारराव अहिल्याबाईंना किती मानत होते हे लक्षात येईल. अत्यंत सामर्थ्यवान असलेल्या अहिल्याबाईंनाही ‘जसे लिहिले तसे करावे' अशी जरब मल्हारराव पत्रातून देत असत. अहिल्याबाईंचे वर्तन नम्र सुनेप्रमाणेच असे. त्यांची मते त्या स्पष्टपणे सांगतं पण त्यात मल्हाररावांचा अपमान होणार नाही अशीही काळजी घेत. वडिलांचा आदर करणा-या भारतीय संस्कृतीचे अहिल्याबाई म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होते. ।

| गोहदच्या राजाला पराभूत करण्यासाठी मल्हारराव कटिबद्ध होते. त्यांच्या अथक प्रयत्नांना अहिल्याबाईंची भरीव मदत होती. गोहदच्या राजाचा पराभव झाला. मल्हारराव सुखावले. अहिल्याबाई पण जरा निश्चित झाल्या. महादजी शिंदे मल्हाररावांच्या मदतीस होते. त्यांच्यासोबतच मल्हारराव अलमपूर मुक्कामी विश्रांतीला गेले. अहिल्याबाई फडणीशी-कोतवाली बघू लागल्या कामे खूप होती. चारच दिवस लोटले आणि खलिता आला.

तीर्थस्वरुप अहिल्याबाई, कळविण्यास अत्यंत क्लेष होतात की, तीर्थरुप सुभेदार मल्हारराव अलमपूर मुक्कामी वीस तारखेस, मंगळवारी दोन प्रहरी पंचत्वात विलीन झाले. कानाला ठणके लागले होते. बहुत उपचार केले. पण यश आले | नाही. आपण सत्वर यावे. शरीर राखून ठेवत आहोत. आपला विश्वासू-महादजी. (२०-५-१७६६)

अहिल्यापुत्र मालेरावास सुभेदारी

| मल्हाररावांच्या मृत्यूमुळे अहिल्याबाईंवर फार मोठा आघात झाला. स्वत:ला सावरत त्यांनी मालेरावच्या हस्ते इतमामाने मल्हाररावांचे अंत्यसंस्कार केले. मल्हारराव त्यांच्या काळातले फार मोठे लढवय्ये, शूरवीर होते. मोठमोठे राजपूत राजे त्यांच्या भीतीने थरथर कापत. 'मल्हार आया' अशी नुसती अफवा जरी आली तरी माणसे थकून जात. अशा थोर सास-यांच्या नांवे अहिल्याबाईंनी अलमपूर येथे मल्हारबांचे स्मारक उभारले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे काही गावे इनाम देऊन खर्चाची व्यवस्था केली. मल्हाररावांबरोबर द्वारकाबाई आणि बनाबाई सती गेल्या. आता हरकुँवर नांवाच्या मल्हाररावांच्या तलवारीशी लग्न करून आलेल्या खांडाराणी फक्त उरल्या. खांडाराणी म्हणजे तलवारीशी लग्न करून झालेली बायको. तिला सती जायची सक्ती नसे. आता हरकुँवर म्हणजेच हरकुआईचाच आधार उरला होता. सगळा वाडा रिकामा झाला. मालेराव, मुक्ता, मैना आणि हरकुँवर! सगळे इंदूर सूतकात बुडून गेले. घरोघरी माणसे रडत होती. कुठे चूल पेटली नाही की

अन्न शिजले नाही. | पेशव्यांकडून मालेरावांसाठी सुभेदारीची वस्त्रे आणि सहीशिक्के आले. ३ जुलैला मालेरावांना सुभेदारीची वस्त्रे देण्यात येणार होती. अहिल्याबाई तर शोकात बुडून गेल्या होत्या. तेवढ्यात गंगोबा तात्यांनी आपली पगडी अहिल्याबाईंच्या पायाशी ठेवली. म्हणजेच नौकरी सोडायचा मनोदय सांगितला. अहिल्याबाईंनी विचारताच त्यांनी कारणे सांगितली. मालेरावांनी सरकारी तिजोरीतून खाजगी खर्चासाठी सपाटा लावला आहे. हजारो रुपये खर्चुन समारंभासाठी पुरुषभर उंचीच्या समया, रुजामे, चांदीचे सिंहासन, लोड, तकिये, गाद्या वगैरे आणले गेले. गंगोबातात्या म्हणाले की, मी मालेरावांना समजवू लागताच म्हणाले, “सुभेदार म्हणा मला. मी मालेराव नाही. ज्या मातोश्री अहिल्याबाईंनी पैचाही खर्च सरकारी तिजोरीतून केला नाही तिथे मालेराव हजारो रुपये उधळीत होते. ते अतिशय उद्धट

आणि हेकेखोर होते. ते कुणालाही आटोपेनात. परंतु अहिल्याबाईंनी गंगोबांना समजावल्या. 'आपण मालेरावना माणूस करायचे आहे असे सांगून पगडी उचलण्यास सांगितले. मालेरावांना वळण लावण्याचे प्रयत्न चालू होतेच! ।

पेशव्यांनी मालेरावास सनद दिली ती अहिल्याबाईंच्या भरोशावर. मालेरावांची लायकी ते जाणून होते. अधिकार प्राप्तीनंतर त्यांचे वेडाचार अधिकच वाढत चालले. मद्यपान करावे, गुटी खावी, हत्तीवर हिंडावे, घोडे पळवावे, झुंजी लावाव्या यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. हिशोबाकडे वळूनसुद्धा बघत नव्हते. हाताखालच्यांना कामे करणे अवघड झाले होते. अहिल्याबाई सर्व प्रकारे उपदेश करीत. अहिल्याबाईंचा त्याला जाच वाटे. त्यांचा धाक सहन होत नसे. पण त्याच्या उद्धटपणास सीमा नव्हती. तो वारंवार अहिल्याबाईंनी महेश्वर येथे राहावे, आमच्या कारभारात लक्ष घालू नये असे बोलत असे. मुक्ता अठरा वर्षांची घोडनवरी झाली आहे, तिचं लग्न आधी करा असंही बोले, अहिल्याबाई महेश्वरी राहू लागल्या पण त्यांची नजर मालेरावांच्या कारभारावर होती.

महेश्वरला येताच दरबार भरवून अहिल्याबाईंनी घोषणा केली. राज्यात भिल्ल, पेंढारी मातले यासाठी आम्ही आमच्या प्राणप्रिय मुक्तेचा विवाह भिल्लांचा बंदोबस्त करणा-या शूरासंगे लावणार. ही घोषणा या आधीही दिली गेली होती. पण भिल्लांचे दंगे प्रबळ होते. कुणी लढवय्या धजत नव्हता. पण अखेर यशवंतराव फणसे या तरुणाने विडा उचलला. त्यांना सर्व मदत देण्यात आली. सैन्य, घोडे, पैसा घेऊन यशवंतराव गेले. त्यांनी असामान्य शौर्य गाजवले. प्रजेस सतावणाच्या भिल्लांचे म्होरके धरून आणले. अहिल्याबाईंची मुत्सद्देगिरी यापुढेच आहे. या

यशवंतराव फणसे आणि मुक्ताबाई यांचे थाटात लग्न झालं, लग्नात भिल्लांच्या म्होरक्यांना 'नायक' ही पदवी देऊन त्यांच्या पगारी नेमणुका केल्या. प्रवासी आणि यात्रेकरूची पूर्ण जबाबदारी नायकांवर टाकण्यात आली. त्यांना पोशाख आणि बाळ्या दिल्या. लुटारुंचे नायक करण्यातला अहिल्याबाईचा दूरदर्शीपणा थक्क करणारा आहे. त्याचा खूप फायदाही झाला.

मालेरावांची अंदाधुंदी ।

अहिल्याबाईंच्या इंदूरच्या खेपा चालूच होत्या. रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्या फडनिशीत काम करीत. मालेरावांचे सर्व लक्ष रंगढंगात होते. मनमानी कारभार, लहरीपणाची कमाल, तापटपणा, विकारांचे दशावतार! ते लहरीत असले की अहिल्याबाई सांगत, “मालेराव, सत्ताधा-यांनी दयाळू असावं. वडीलधा-यांचं ऐकावं. त्यांचा सल्ला मानावा. अपमान करू नये. राज्याचा वसूल वाढता असावा. सरकारी तिजोरीतला पैसा खाजगीकडे वापरू नये यासाठी दक्ष असावं." पण सगळे पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याप्रमाणे व्यर्थ! सुभेदारीची वस्त्रे घेतल्यापासून खाजगीतले पांच लक्ष उडाले होते. सरकारी खर्चाचा तर खर्चवेच लिहिणे कठीण झाले होते. त्यातून आता मनुष्यवध करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मालेरावांची एक आवडती दासी होती. तिच्या पतीचा मालेरावाने खून केला. अहिल्याबाईंनी या

सगळ्यांचे पुरावे प्रत्यक्ष पाहिले. नोकरांच्या जबान्या घेतल्या. मालेरावावर कारवाई • करण्याचे मनी योजले; पण दैवात वेगळेच होते. ।

(मनुष्यवध - पुण्यश्लोक अहिल्याबाई - पान २७ / म. श्री. दीक्षित) ।

मरणाच्या त्या माणसाने, मरतांना मालेरावाला शाप दिला- "भूत होऊन छातीवर बसेन. तुला अन्न खाऊ देणार नाही. मध्यरात्री गळा घोटेन.' याचा परिणाम मालेरावच्या मनावर झाला. तो मनोरुग्ण झाला. त्याला अन्नात रक्त दिसू लागले. रात्री कुणीतरी गळा दाबतय असा भास होई. मधेच विंचू चावला, साप चावला असं ते ओरडत. दुधात त्या मेलेल्या माणसाचं शीर दिसे. मालेरावांना वेड लागलं. । तीन महिन्यात मालेरावाचं नुसतं अस्थिचर्म राहिले. अशातच वेड आणखी बळावले आणि मालेरावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंनी त्याची दिवसरात्र सेवा केली. पण यश आलं नाही. मालेरावच्या दोन्ही बायका मैना आणि पिरता। त्याच्याबरोबर सती गेल्या. अहिल्याबाईंना या सतीप्रथेची चीड येई. त्यानी या मुलींना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण नातेवाईकांच्या रेट्यापुढे त्यांचं काहीही चाललं नाही. तुम्ही सती न जावून धर्म बुडवला' हे त्यांना सतत ऐकावं लागलं. जी स्त्री धर्मश्रेष्ठ होती तिला अशी दूषणे लावली गेली. त्या सती न जाताही रोज सती जात होत्या. मालेरावाने सातआठ महिनेही राज्य केले नाही. त्यातून चार पाच महिने तर वेडाने ग्रासले होते. पहिल्या चार महिन्यात तिजोया रिकाम्या करण्याचेच कार्य केले. | आपल्या एकुलत्या एक मुलाच्या निधनाने, अहिल्याबाईंचे मन शोकात बुडून गेले. आपण वारस घडवू शकलो नाही याची त्यांना टोचणी लागली. कुठेतरी दूर निघून जावे या वेदनेपासून मनाच्या टोचणी झुरणीतून सुटावे असे वाटू लागले. पण अखेर अहिल्याबाई विवेकाची पुतळी होत्या. संयम, विवेक यांनी त्यांचे मन परिपूर्ण होते. ज्या प्रजेसाठी त्या सती गेल्या नाही त्या प्रजेची त्या आई होत्या. आपले कर्तव्य समोर आणून त्यांनी आपल्या मनाला आवर घातला. जीवनाच्या कठोर कार्यक्षेत्रात त्या पुन्हा झेपावल्या. कामे तर पुष्कळच होती. मुलाच्या स्मृतीनिमित्त इंदूर येथे छत्री उभारण्याचे काम त्यांनी सुरू केले. आता तेवढेच त्यांच्या हातात होते. मुलाची स्मृति!

रघुनाथरावांची फजिती

| या स्वार्थी जगाला कर्तृत्ववान माणसाची किंमत नसते. ते आपले उखळ पांढरे करायच्या मागे असतात. गंगोबातात्या चंद्रचूड यांच्या मनात असंच पाप आलं. वास्तविक, अहिल्याबाई त्यांना बंधू म्हणत. गेली चाळीस वर्षे ते कारभारी होते. त्यांनी राघोबादादांना म्हणजेच रघुनाथराव पेशव्यांना गुप्त पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, “होळकरांची दौलत आता बेतलमाल झाली आहे. सगळे दु:खाने गालब आहेत. तेव्हा आपणा उभयतास ही अमृतसंधी आहे. आपण त्वरित येऊन दौलत समेटावी. मी आतून आपणास साथ देतोच आहे.'' हे पत्र मिळताच रघुनाथराव मोठे सैन्य घेऊन निघाले. अहिल्याबाईंना गुप्तहेरांकडून आणि काही स्वामीनिष्ठ मंडळींकडून ही वार्ता समजली. अहिल्याबाई संतापून गेल्या. मी खुळी नाही की दुबळी! त्यांनी लेखनिखास बोलावून पत्रे सांगण्यास सुरुवात केली. पहिले पत्र तुकोजी होळकर यांना लिहिले. हे मल्हाररावांचे दासीपुत्र होते. अहिल्याबाईंना मातोश्री म्हणत आणि अहिल्याबाईसुद्धा त्यांना चिरंजीव म्हणत.

चिरंजीव तुकोजी होळकरास शंकर आज्ञेकरून, मातोश्री अहिल्याबाईंचा आशीश. । | मार्मजींनी अवसानकाळी आमचे पुत्राचा हात आपल्या हाती दिला. आपण पाणी सोडताच पिंडास काकस्पर्श झाला. याचे स्मरण ठेवून उदेपुरात जेवत असाल तर हात धुण्यास महेश्वरी यावे. संकटाचा काळ आहे. आपणास सुभेदारीची वस्त्रे देणे आहे. पण त्यासाठी हे राज्य राखणे आवश्यक. रघुनाथरावांच्या मनात पाप

आले आहे. ते हे राज गिळंकृत करण्यास येत आहे. आमंत्रण देणारे घरचेच! पत्र देखता सत्वर यावे. | हे पत्र लिहून त्यांनी सांडणीस्वाराबरोबर पाठवले. नंतर सर्व सरदारांना सरंजामदारांना, त्याचप्रमाणे शिदे, पवार, गायकवाड यांना सत्तावीस पत्रे लिहिली. त्यांनी लिहिले,

कैलासवासी सुभेदारांनी अजोड अखंड तलवारबाजी करून राज्याची वीट वीट जोडली. इमारत उभी केली. तलवारीच्या जोरावर हे राज्य उभे केले.
आमच्यावर एकामागून एक संकटे. आमचे कष्टार्जित दौलतीविषयी पापबुद्धि धरून रघुनाथराव युद्धास उभे ठाकले आहेत. तेव्हा कैलासवासी सुभेदारांच्या मैत्रिकीस जागून तमाम फौज पाठवावी.

श्रीशंकर आज्ञेकरून.

अहिल्याबाईंनी पत्रावर सदैव श्रीशंकर आज्ञेकरून अशी सही केली. हे राज्य ईश्वराचे आहे, आपण चाकर हीच भावना सदैव होती. या कटकारस्थानाचा सुगावा लागताच त्या गरजल्या, “आमच्या पूर्वजांनी कुणाची खुषमस्करी करून हे राज्य कमावले नाही तर रक्ताचे पाणी केले आहे. मी एक अबला, असहाय्य स्त्री आहे या भ्रमात कोणी राहू नये. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभी राहिले तर, सगळे मनसुबे जागच्या जागी विरतील. माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहिले तर, आमचीही तलवार चालेल.'' अशा या तेजस्वी स्त्रीने रघुनाथरावांनाही पत्र लिहिले.

"आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात. आमचेकडील फितूरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणातच पडेल. माझ्याबरोबर युद्धकलेत पारंगत असणा-या स्त्रियांचीही फौज असेल. मी हरले तरी कीर्ति करून जाईन. पण आपण स्त्रियांकडून हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अहिल्याबाईंना तिच्या राज्यासकट गट्ट करता येईल या भ्रमात न राहावे. त्यातच आपले हित आहे. श्रीशंकर आज्ञेकरून,

| इतके झाल्यावर त्यांनी सर्व लोकांना बोलावून सांगितले की या राज्यावर ज्यांनी सत्ता गाजवली त्यांची मी सून आहे, दुस-याची पत्नी आणि तिस-याची आई

आहे. या राज्याचे रक्षण हे माझे कर्तव्य. या प्रजेची आई होण्यासाठीच मी सती गेले नाही. अशाप्रकारे या मुत्सद्दी स्त्रीने सर्व व्यूह पूर्ण रचला. दु:ख बाजुला ठेवून ही करारी आणि खंबीर स्त्री कडेकोट तयारी करण्याच्या मागे लागली. तुकोजीच्या अधिकाराखाली सैन्य तयार झाले. स्त्रियांची फौज उभी राहिली. स्वतः सर्व पाहाणी आणि देखरेख करू लागल्या. त्यांचा तो तेजस्वी कर्मठपणा आणि शौर्याचा आवेग बघून सैन्यात अपूर्व उत्साह आला. तोपर्यंत भोसले, गायकवाड यांचेही सैन्य येऊन पोचले. रघुनाथराव उज्जैनपर्यंत पोचले होते. तुकोजीरावही सैन्यासह निघाले. क्षिप्रा नदीच्या अलिकडे तुकोजी पलीकडे रघुनाथराव! तुकोजीने निरोप पाठवला, ‘‘क्षिप्रा ओलांडताच तलवारीला तलवार भिडेल.'' तेवढ्यात अहिल्याबाईंचे पत्रही त्यांना पोचले. समोरचा सेनासागर दिसला. अहिल्याबाईंची ही सर्व योजना म्हणजे तेजस्वी बाणेदारपणा, चातुर्य, दूरदर्शीपणा यांचा अत्युत्तम संगम होता. रघुनाथराव पार गडबडून गेले. युद्ध केल्यास पराभव अटळ होता. मागे फिरणे लाजीरवाणे होते. तेव्हा त्यांनी निरोप पाठवला की, “मी तर आपल्या पुत्राच्या अपमृत्यूची दुःखवार्ता ऐकून आपल्या सांत्वनास येत होतो. आपण चुकीचा ग्रह करून घेतला त्याला काय म्हणावे?' यावर अहिल्याबाईंनी निरोप पाठवला. “सांत्वनास येण्याची कृपा केली. पण त्यासाठी ही अफाट फौज कशाला? आपण एकटे या. हे घर आणि इथली । फौज आपलीच आहे." | चेहरा टाकून राघोबा आले. दुखवट्याच्या चार गोष्टी करून खजील होऊन परतले. राघोबा डाव हरले होते. अहिल्याबाईंनी आपल्या उत्तुंग प्रतिभेने राज्यावरचे गंडातर टाळले होते. या प्रसंगामुळे त्यांची कीर्ति दूरवर पसरली. आपल्या अंगच्या अनेक गुणांचे प्रात्यक्षिकच जणु त्यांनी प्रजेला आणि समाजाला दाखवून दिलं. स्त्री शक्तिचा प्रत्यय आणून दिला. १७६७ मध्ये अहिल्यादेवींच्या इच्छेनुसार पेशव्यांनी तुकोजीरावांना माळव्याचा सुभेदार नेमले आणि अहिल्यादेवींनी राज्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. पेशवे अहिल्याबाईंना मातोश्री अहिल्यादेवी म्हणू लागले. अहिल्याबाईंच्या मनात नर्मदा नदीविषयी अत्यंत श्रद्धा होती. नर्मदाकाठचे महेश्वर हे स्थान त्यांनी राजधानीसाठी निवडले. या नगरीचे जुने नांव महिष्मती असे होते. रामायण, महाभारत, पुराणे, धर्मग्रंथ यात महिष्मती नगरीचा उल्लेख आहे. प्रसिद्ध राजा सहस्रार्जुन याची हीच राजधानी होती. लंकापती रावण इथे आला असता त्याने आपल्या शक्तिने नर्मदेचा प्रवाह कोंडून ठेवला. पण तो प्रवाह निसटून हजार धारांनी बाहेर पडला अशी कथा आहे. महेश्वरापासून तीन मैलावर नर्मदेकाठी सहस्त्रधारा हे स्थान आहे ते या कथेतील सहस्त्रधाराच होय!

कवि कुलगुरू कालीदासानेही रघुवंशात महिष्मतीचा उल्लेख केला आहे. श्रीमान शंकराचार्य आणि मंडणमिश्र यांचा सुप्रसिद्ध विवाद याच नगरात झाला होता. इ.स. १७३०च्या सुमारास मल्हारराव होळकरांनी महेश्वर मुसलमानांकडून जिंकून आपल्या राज्यात आणले होते. अहिल्याबाईंना हे स्थान आवडे ते नर्मदेमुळे. नर्मदा अमरकंटकहून निघून भडोच या शहराजवळ अरबी समुद्राला मिळते. तेथपर्यंत नर्मदेच्या दोन्ही काठावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. महेश्वरला नर्मदेचे पात्र खुपच विस्तारलेले आहे. अहिल्यादेवींनी येथे राजधानी स्थापन केली आणि महेश्वरचे भाग्य पुन्हा तरारून आले. | अहिल्यादेवींचे निवासस्थान अगदी साधे एखादे घर असावे तसे होते. राजमहाल वाटावा असे काहीही तिथे नव्हते. कुठलीही सजावट नाही की अवडंबर नाही. घरात एखाद्या मंदिराप्रमाणे वातावरण तेव्हाही असावे आणि आजही आहे. याच घरात राजदरबार भरत असे ती मोठ्या ओसरीसारखी जागा आहे. घरातील मंदिरात अनेक शिवलिगे आहेत. सोन्याचा पाळणा आहे. देवाचा जन्मोत्सव त्या पाळण्यात होई.

महेश्वराची 'राजधानी' झाली आणि माणसांचा राबता सुरू झाला. महेश्वर गजबजून गेले. अहिल्यादेवींनी खाजगी पैसा खर्च करून नर्मदेस सुंदर घाट बांधले. कलापूर्ण देवळातून मंत्रजागर होऊ लागला. प्रजेस बसण्यासाठी चिरेबंदी पाय-या बांधल्या गेल्या. नव्या पेठा, नव्या हवेल्या. विणकर आले, सोनार आले. नामवंत वैद्यांना आमंत्रणे देऊन क्षय या रोगावर संशोधने सुरू झाली. संस्कृत पाठशाळा उघडली गेली. विद्वानांना, कलावंतांना राजाश्रय मिळू लागला. महेश्वरचे सांस्कृतिक वैभव झपाट्याने वाढले. मुलींची पाठशाळा आणि स्त्रियांना शस्त्रशिक्षण हे काम अहिल्यादेवींनी दोनशे वर्षापूर्वी सुरू केलेले पाहून मन चकित होते. जिल्हापरिषदा, खेड्यापर्यंत न्याय, कुटिरोद्योग, हुंडाबंदी, दारूबंदी हे सारे कार्यक्रम अहिल्यादेवींनी प्रथम सुरू केले हे कळल्यावर त्यांच्यापुढे साष्टांग दंडवत घालावेसे वाटते. त्यांनी जंगलतोडीस विरोध केला. हुंडा देणान्यास आणि घेणा-यासही शिक्षा ठोठावल्या.

त्याकाळचे शाहीर अनंतफंदी यांनी कवितेत वर्णन केले आहे. त्याचा मतितार्थ असा, ‘नर्मदेच्या काठी बांधलेल्या उंच मंदिरांमुळे, घाटांमुळे महेश्वर तीर्थक्षेत्र कैलासासारखे मनोहर वाटते. देशोदेशीचे लोक इथे येतात. अहिल्यादेवींचे कार्य बघून कृतार्थ होतात. इथे गडगंज संपत्ती आहे. बाजार, दुकाने गजबजलेली आहेत. अहिल्यादेवी आपल्या प्रजेचा प्रतिपाळ पोटच्या मुलांप्रमाणे करीत आहेत. प्रजेचे रक्षण आणि त्यांच्या सुखसोयीकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. अन्नछत्रातून गोरगरीब आनंदाने भोजन करतात. अशा या महेश्वरातून त्या काळचे सर्व राजकारण चालले. अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. सुधारणा झाल्या. प्रजेसाठी रात्रंदिवस राबणारी प्रजेची आई तिथे होती. पेशवे म्हणत की पुण्याचे पुण्यद्वार महेश्वर येथे आहे. यात महेश्वर नगरीचा आणि अहिल्यादेवींचा गौरव पुरेपुर भरलेला आहे.
युद्ध ही विनाशकारी प्रथा आहे असे अहिल्यादेवींचे मत होते. त्याची अनेक कारणे त्या देत. पहिले कारण प्रजेची अपरिमित हानी होते आणि ज्या धनामुळे लोकांची प्रगती होण्याची शक्यता असते त्या धनाचा दुरुपयोग युद्धात होतो. पुन्हा समाजाचे, राज्याचे नेतेपण करणा-या प्रमुख व्यक्ति युद्धात गुंतल्यामुळे त्यांचा प्रजेस उपयोग होत नाही. अशा बुद्धिमान व्यक्तिचा युद्धात विनाश होण्याचा संभव असतो. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात मनुष्यबळ खर्ची पडते. सामान्य माणसे तर किडामुंगीसारखी मरतात. राज्याच्या तिजोरीवर भार पडतो. या शक्तिचा उपयोग राज्याचे नंदनवन करण्यासाठी व्हावा असा त्यांचा दृष्टिकोन होता. या कारणांमुळे युद्धे टाळण्याकडे त्यांचा कल होता. पण चंद्रावतांनी जेव्हा त्यांना आव्हान दिले तेव्हा त्या स्वतः रणात उतरल्या होत्या असे इतिहास सांगतो. जयपूरचे राजे सवाई जयसिंह यांना दोन मुले होती. ईश्वरसिंह आणि माधवसिंह. माधवसिंहाची आई उदयपूरची राजकन्या, तो ईश्वरसिंहापेक्षा वडील होता आणि मामा संग्रामसिंह याचेकडेच राहत होता. मामाने त्याच्या हातखर्चासाठी त्याला रामपुरा गावाची जहागीर दिलेली होती. जयसिंहाच्या मृत्यूनंतर जेष्ठ पुत्र म्हणून माधवसिंहाचा गादीवर अधिकार होता. परंतु त्याच्या गैरहजेरीत धाकटा ईश्वरसिंह गादीवर बसला. माधवसिंहाचा अधिकार डावलला गेला म्हणून उदयपूरचा राजा राणा जगजितसिंह फारच चिडला. तो माधवसिंहाचा मामेभाऊ होता. ईश्वरसिंहाचा पराभव करण्याइतके सैन्य त्याच्याजवळ नव्हते म्हणून त्याने मल्हारराव होळकरांची मदत त्यावेळी मागितली आणि माधवसिंहाची बाजू न्यायाची असल्यामुळे मल्हाररावांनी मदत करण्याचे मान्य केले. ईश्वरसिंगास लेखी कळवले की गादी माधवसिंहास द्यावी. ही कथा मल्हारराव जिवंत होते तेव्हाची आहे. मल्हाररावांना राजे अतिशय घाबरत. मल्हाररावांचं पत्र वाचून ईश्वरसिंह घाबरला आणि त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर माधवसिंग गादीवर बसला. त्याने दिलेल्या वचनानुसार ठरलेली रक्कम मल्हाररावांना दिली. त्यात रामपुरा हे गाव त्यांना दिले. वास्तविक रामपुरा गाव त्याच्या मामाचे होते. माधवसिंग मामाकडे राहत होता तेवढ्यापुरते त्याच्या हातखर्चाला दिले होते. ते त्यांना न विचारता मल्हाररावांना माधवसिंहाने देणे अन्यायाचे होते. रामपूरचा अधिकारी उदयपुर घराण्याचा होता. त्याचे नाव चंद्रावत होते. मल्हाररावांचे वर्चस्व त्याला खुपत होते; पण तो काही करू शकत नव्हता. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवी राज्यकारभार पाहू लागल्या. चंद्रावताने अहिल्याबाईंवर चढाई करण्याची तयारी चालवली. त्यांनी निम्बहेडा, जावद आणि आसपासची गावे बळकवायला सुरुवात केली. अहिल्याबाईंना संताप आला. होळकरांचे सैन्य तुकोजीबरोबर जाटांशी लढाई करण्यात गुंतले होते. अहिल्याबाई विचलित झाल्या. त्यांनी विचार केला की चंद्रावतांची फौज तीस हजारांची. आपल्याजवळ पाच हजारही नाही. उगाच माणसे जायबंद करून हार कशाला घ्यायची? यावेळी गनिमी कावा करून तडजोड करावी. त्या आपल्या सैनिकांना म्हणाल्या, 'आपण सारे मर्द आहात; पण आपण यावेळी संख्याबळाने कमी आहात. आपणास यावेळी तडजोड हिताची. दहापंधरा गावे तुमच्यापेक्षा मला जास्त नव्हेत. वेळ येताच बदला घेऊ.' असे म्हणत त्यांनी चंद्रावतांना त्यावेळी ३१ गावे देऊन टाकली. पण त्यानंतर १७८३ सालात चंद्रावतांनी पुन्हा उठाव केला. त्यावेळी मात्र अहिल्याबाईनी स्वतः येऊन युद्धनगारा वाजवला. अर्ध्या तासाच्या आत सैन्य शस्त्रास्त्रासह सज्ज झाले. त्या स्वतः सैन्याबरोबर जावेद येथे गेल्या. तिथून युद्धाची सर्व तजवीज करू लागल्या. शंभर स्वार आले ते रवाना केले, पन्नास आले, पाचशे आले, रवाना केले. ज्वाला तोफ पाठवली. शेवटच्या तुकडीबरोबर स्वतः अहिल्याबाई घोड़ासवार होऊन निघाल्या. सैन्यास म्हणाल्या, ''रजवाड्यास काय भिता? सगळे पोचट पुरुष, सर्वे मिळून चढाई करा. रजवाडे तुम्हाला भारी नव्हेत. मेवाड होते का नव्हते करून टाका. बोला मार्तड की जय!'' आणि सैन्याने धडक मारली. मेवाडचा राजा फौजेला मिळाला. चंद्रावतांच्या बीमोड करून रामपुरा घेतला. तोच शरीफभाईच्या हाताला गोळी लागली. अंबाजीपंत कोसळले. पण त्यांनी रजवाडे कापून काढले. ज्वाला तोफ डागताच अलंगतट फोडून गेली. तिथेच सोभागसिंग हाती सापडला. त्याने वाटेत बारूद पसरून ठेवली होती. रजवाड्यांच्याच हाताने त्यावर जळता काकडा पडला. आपल्याच बारुदीने काही जळाले काही पळाले. सोभागासिंहाला धरून

अहिल्याबाईंसमोर उभे केले. तो अहिल्याबाईची विनवणी करत म्हणाला, ''मातोश्री क्षमा करणे हा आपला लौकिक, आजन्म दास होऊन राहीन.'' त्यावेळी अहिल्यादेवींचे बोल गरजले, “सोभागसिंग, क्षमा पहिल्या दुस-या गुन्ह्याला. तुमच्या शब्दात आता पाणी उरले नाही. शपथांची शंभरी झाली. सतत रामपुरयाचे झगड़े उकरता. तुम्हास क्षमा अशक्य." आणि सोभागसिंगाला अहिल्यादेवींनी तोफेच्या तोंडी दिले. होळकरांचे निशाण उंच फडकले. अहिल्यादेवींच्या शौर्याला पुणे दरबारी तीन तोफा सलामी दिली गेली. राजदरबारात नाना फडणीस म्हणाले, “अहिल्यादेवींची शौर्यकथा आणि पराक्रम अजोड आहे.'

रामपु-याच्या चंद्रावतांनी तीन वेळा बंडाचा झेंडा उभारला. तिन्ही वेळेला सुभेदार तुकोजीराव सैन्यासह दूर होते. प्रत्येक वेळी आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने, शौर्याने अहिल्यादेवींनी शत्रूला खडे चारले. युद्धाचे संचालन करण्यातले त्यांचे असामान्य कर्तृत्व बघून, राज्याराज्यात त्यांची कीर्तिचर्चा होऊ लागली. चंद्रावतांच्या उठावापासून बीमोडापर्यंतची ही वर्षानुवर्ष चाललेली कथा. मल्हाररावांपासून अहिल्याबाईंपर्यंत. यातील अधोरेखित करण्याचा भाग म्हणजे, अहिल्यादेवींचे युद्धासंबंधीचे विचार, जे या प्रकरणाच्या पहिल्या परिच्छेदात मांडले आहेत-ते विचार आजही, आजच्या घडीतील युद्धालाही लागू होतात. अहिल्यादेवींचे विचार आजही तेवढेच ताजे वाटतात हेच त्यांचे मोठे यश आहे.

अहिल्यादेवींचे कामकाज

उदंड कीर्ति मिळवणा-या तेजस्वी अहिल्याबाईंचे सांसारिक जीवन म्हणजे केवळ उन्हाळा होता. गौतमाबाई आणि मल्हारराव त्यांना पोरके करून निघून गेलेमालेरावांचा भीषण मृत्यू झाला. खंडेराव तर कधीच निघून गेले. खंडेरावांच्या नऊ सती, मल्हाररावांच्या दोन सती, मालेरावांच्या दोन सती, अशा तेरा स्त्रियांना सती जातांना त्यांनी पाहिलं. मुक्ताबाईला एकच मुलगा नथू. हा एकच नातू पण त्यालाही क्षयरोगाने ग्रासले होते. कधी ताप, कधी खोकलावैद्याचं संशोधन त्याच्या कामी येत नव्हते. मुक्ताबाई तर जणू मातृसेवेसाठीच जन्मली होती. तिचाच फक्त आधार होता. तिच्यासंगतीने अहिल्याबाईंच्या सांसारिक उन्हाळ्यात थोडा गारवा येत असे.

त्यांचा दिनक्रम आखलेला असे. सकाळी पहाटेच उठत. स्नान वगैरे आटोपून शंकराची पूजा करीत. स्तोत्रे म्हणत. मग दिवसभराच्या कामाची आखणी करीत. नंतर पेलाभर दूध पिऊन, तक्रारीचे कागद वाचून ठेवीत. गुप्त पत्रे लिहीत, फडणीशी कोतवालीतली कामे बघून, भोजन करावे. त्यानंतर न्यायदान, व्यवस्था, हिशोब बघता बघता मध्यरात्रही उलटून जाई.

अहिल्याबाई कुणाचा निष्कारण अनादर करीत नसत. अनादर करणे, अपमान करणे हे पाप आहे, असे त्या मानीत-कोणत्याही अधिका-यांनी प्रजेचा अपमान करू नये कारण प्रजेसाठी आपण आहोत हे त्या पुन्हा पुन्हा सांगत. प्रजेशी अनुचित व्यवहार आणि असत्य भाषण हीच त्यांच्या संतापाची कारणे होती. त्यांचा प्रजेशी व्यवहार कशा त-हेचा होता त्याचे काही नमुने पाहिले की त्यांच्या बुद्धिची झेप लक्षात येते. | चांदवड येथील मामलेदाराने एका बोहयाचा छळ चालवला होता. ही हकीगत अहिल्यादेवींना कळताच त्यांनी मामलेदारास ठणकावले, की प्रजेची हरप्रकारे इज्जत केली पाहिजे. सन्मान केला पाहिजे. तुमच्याबद्दल पुन्हा कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही. (होळकर रेकॉर्ड) | तुकोजी होळकरांनासुद्धा त्या हिशोबासाठी वेठीस धरत. हिशोबातले गोंधळ त्यांना एका नजरेत समजत. तुलाराम होळकर यास त्यांनी लिहिलेले पत्र उपलब्ध अहिल्यादेवींनी तुकोजीस उपदेश केला. म्हणाल्या, “चिरंजीव, मोहिमेत मिळालेली लूट आजकाल भरणा होत नाही. साठलेले पाणी पुरत नसते. आम्हास थोरल्या सुभेदारांनी आणाशपथा घालून, हिशोब लिहायला शिकवले. फौज किती बाळगली. वसूल किती आला, चाकरी किती घडली याचा खर्चवेच लिहावा. आपले आणि शिद्यांचे महालराज्य सारखेच असून आपला वसूल इतका कमी कसा, हा प्रश्न पुणे दरबाराने विचारला आहे-आपण श्रीमंतांचे चाकर हे मनी सदैव असू द्यावे. जबाब देणे आहे. रात्रीपर्यंत वह्या हजर करा.'

अहिल्याबाई मृदु होत्या तितक्याच वेळप्रसंगी अत्यंत कठोर होत. पुणे दरबारातून हरिपंत आले होते ते अहिल्याबाईंचा पाठिंबा बारभाईला मिळवण्यासाठी. ते अहिल्याबाईंना म्हणाले, “मातोश्री, रघुनाथरावांनी वैर मांडले आहे. त्यामुळे आपला पाठिंबा बारभाईस शपथपूर्वक द्यावा. त्यावर उसळून देवी म्हणाल्या, ‘कैलासवासी सुभेदारांपासून आमची निष्ठा कैलासवासी बाजीरावांचे गादीशी. त्या गादीशी जे असतील ते आमचे मार्तड. रघुनाथरावास नर्मदा उतरू दिली नाही. आम्हालाही शपथक्रिया करावी लागते असं आपण मानता, हेच आश्चर्य. मनीच्या एकनिष्ठेने आम्ही कधीच बेलभांडार उचलला आहे. बेल म्हणजे आमच्या लेखी भाजीपाला नव्हे. आपले बोलणेच अप्रशस्त!'' असा स्वभावाला पीळ होता. हरीपंतांनी जाणले की, अहिल्यादेवी अत्यंत हुशार, मुत्सद्दी, बोलण्यात धीट आणि फटकळ, व्यवहारात चोख! त्यांनी महेश्वरचा डौल पाहिला, बाजारपेठा, संशोधन केंद्रे, पाठशाळा, किल्ल्याची शिबंदी, युद्धभांडार, चिलखते, भालाबरच्या, जंबुरेतोफा! थक्क झाले. त्यांनी अहिल्यादेवींचे दरबारी कामकाज पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र गुप्तपणे मला बघायचे आहे की त्या न्यायदान कसे करतात. मी फार प्रशंसा ऐकून आहे.

हरिपंत एका शेतक-याच्या वेशात येऊन बसले. दरबारात एक कवि आला. आपले कवन त्याने वाचायला सुरुवात केली.

देवि अहिल्ये शुद्धमति तू सर्वाची माता । ईश्वर आला तुझ्या स्वरुपे होऊनिया त्राता ।। तव पायाशी तीर्थे सगळी, देवदेवळे ती । स्वर्गामध्ये नारद तुंबर तव लीला गाती ।।

या चार ओळी ऐकताच अहिल्यादेवी म्हणाल्या, “कविराज, तुमची माझ्याविषयी श्रद्धा मी जाणते. त्याचा आदरही करते. पण मजसारखीचे हे अतिशयोक्त मला ऐकवत नाही. हे असंभव मला ऐकवत नाही. ईश्वराने माझ्यारुपे अवतार घेणे अशक्य, नारद तुंबर स्वर्गात माझी लीला गाणे अशक्य. देवांना आणि देवळांनाही तुम्ही मज अभागिनीच्या पायाशी आणून ठेवले. हा तर कविराज अक्षम्य अपराध आहे. कशासाठी तुम्ही हे असे अतिशयोक्त गाता? आपणास दैवे काव्यगुण मिळाले. ते चार पैशासाठी सत्ताधा-यांची कौतुके गाण्यात का दवडता? अहो, समाजाची दु:खे मांडा, शौर्याची पोवाडे गा, ईश्वराची लीला रचा, मग सोन्याचे कडेही देईन. परंतु आज ती चोपड़ी इकडे द्या, नर्मदेत बुडवते! या तुम्ही!'' हरीपंत ऐकत राहिले. पाहत राहिले. थक्क झाले. यातर देवाहूनही थोर! देवालाही स्तुती आवडते पण अहिल्यादेवींनी ते स्तोत्र नर्मदेत फेकले, असे तेज पाहिले नाही! अहिल्यादेवींच्या वाचेत अशी जबरदस्त शक्ति होती.

अहिल्याबाईंच्या नावे अशी कितीतरी प्रकरणे आहेत. आणि काळाच्या ओघात दोनशे वर्षांचा काळ म्हणजे जास्ती नाही! त्यामुळे या कहाण्या ऐतिहासिक स्वरुपाच्या ख-या गोष्टी आहेत. त्यांच्या अंगच्या गुणांचे सामर्थ्य अधोरेखित करणाच्या आहेत. अहिल्याबाईंनी काशी येथे ब्रह्मपुरीची स्थापना केली हे ऐतिहासिक सत्य आहे. एकदा काशीचे ब्राह्मण अहिल्याबाईंकडे आले. तिथे मुसलमानांचा उच्छेद फार झाला होता. वेदाभ्यास करण्यास निश्चित जागा नव्हती. मुसलमान हल्ला करीत तेव्हा शिष्यगण भीतिने सैरावैरा पळून जाई. आश्रमास कोणी जागा देत नव्हते- अहिल्याबाईंनी त्यांच्याबरोबर विसाजी देशपांडे यांना पाठवले. ते तिथल्या अंमलदाराशी बोलणे करून, आश्रमासाठी जागा, परिसर देतील, असे त्या ब्राह्मणांना सांगितले. ब्राह्मण अतिशय आनंदित होऊन धन्यवाद देऊ लागताच त्या म्हणाल्या, “थांबा, माझे पुढील बोलणे सक्त ध्यानात ठेवा. तिथल्या वास्तूचे नाव ब्रह्मपुरी असेल. दर तीन महिन्यांनी किंवा मनात येईल तेव्हा

आमचे गुप्तहेर तिथे येतील. कधी शिष्यरुपे, कधी अतिथीवेशे, तर कधी भिक्षुकवेशे. ब्रह्मपुरीची पाहणी होईल. आपले ज्ञानदान खरोखरीच चालू असेल तर

आपणास काडीचाही धोका नाही. परंतु याखेरीज इतर काही असेल तर कपाळी शिक्षा येईल. साखळदंडाने जेरबंद केले जाईल. आमचे वकील तिथे आहेत.' ब्राह्मण हे सारं ऐकूनही अहिल्याबाईंना आशीर्वाद देत गेले. । विसाजीपंत त्यांची व्यवस्था करून आले. त्या चार ब्राह्मणाची ते कौतुक गात होते. एकपाठी असलेले त्यांचे शिष्य विसाजीपंतांना चकित करून गेले... अहिल्याबाईंना अशा सत्कार्याचा अतिशय आनंद होत असे. अजून ठाई ठाई विहिरी खोदायच्या होत्या. धर्मशाळा बांधायच्या होत्या. योजना पुष्कळ पण सरकारी तिजोरीत हिशोबाचा राडा होता. फौजेचा खर्चही अहिल्याबाई खाजगी तिजोरीतून करत होत्या. तुकोजी हाताबाहेर चालले होते. अहिल्याबाई आणि तुकोजी होळकरांचे वितुष्ट हा चर्चेचा विषय झाला होता. अखेर महादजी पाटील दोघात समझोता करावा म्हणून मुद्दाम आले.

अहिल्याबाईंनी महादजीस तुकोजीबद्दल सविस्तर सांगितले. ते मद्याच्या आहारी गेले होते. राधी नावाची त्यांची ठेवलेली बाई होती तिच्या दारी हत्ती झुलत. मद्याचे बुधलेच्या बुधले जाते. त्या म्हणाल्या, 'तुकोजींची दुष्कृत्ये त्यांना छळतात. हिशोब तर नाहीच, माझाच पैका ओरबडून खातात. त्यांचेकडून तिजोरीत या बारा वर्षात भर नाही अशाने राज्य राहील का? आपण वाकड्या चालीने चालावे अन् माझ्यावरच कुरघोडी करावी असे चालले आहे. त्यांचे सगळे फंद निमकहरामीचे आहेत. चार महाल घेऊन आम्ही बाजूस व्हावे असे त्यांचे मनी. वीट वीट जोडलेली ही इमारत ढासळताना आम्ही कशी बघणार? डोळ्यासमोर राज्याचा नाश । होईल." हे सारं ऐकून महादजी म्हणाले, “मातोश्री, आता अधिकउणे न बोलता जोडून घ्यावे. आम्ही पुरुष आपण केवळ स्त्री आहात. आम्ही आक्रमण करायचे ठरवले तर?'' यावर ताडकन उभे राहत ती तेजाची पुतळी बोलली, "अवश्य, पाटीलबाबा, तुकोजीसह उभयता फौजबंदीने या. कैलासवासींच्या कृपेने इथेही कोणी बांगड्या भरून बसलेले नाही. श्री मार्तडेकरून दारुबारूद येथेही सिद्ध आहे. नाही एकेकाला हत्तीच्या साखळदंडाने बांधले तर सुभेदारांचे नाव सांगणार नाही. आमच्याही सैन्याची करामत पाहून जा. आता या गोष्टीस चुकाल तर तुम्हाला मार्तडाची शपथ आहे!" अशा जहाल उत्तरावर पाटीलबाबांनी हसण्यावारी गोष्ट नेली. पण या तेजाने ते दिपून गेले होते.

तुकोजीरावाने अहिल्याबाईंच्या कागाळ्या पेशवेदरबारापर्यंत नेल्या तेव्हा मात्र हा गृहकलह उघडा करणे त्यांना भाग पडले. त्यांनी पुणे दरबारी पत्र लिहून सर्व कळवले. त्यांचे राजकारणाचे ज्ञान, कारभारासाठी लागणारी तेज बुद्धि, राज्यावरील निष्ठा आणि पेशव्यांबद्दल असणारी श्रद्धा या सा-याचं दर्शन यातून घडतं. त्यांनी दरबारी कळवले की, 'चिरंजीव तुकोजींनी गृहकलहाचा दुलौकिक आपणापर्यंत आणला. म्हणून या वयात सुभेदारांच्या सुनेस बेलभांडार करणे भाग पडते आहे. आम्ही श्रीमंतांचे गादीस आणदाणा बांधलेलो आहोत. हे वचनाने कृतीने सिद्ध आहे. ही संकटाची वेळ. इंग्रज वसई घेऊन बसलेला! म्हणून शब्दही न बोलता, फौजेस पैसा पुरवत राहिले. चिरंजीवास सुभेदारी दिल्या. दिवसापासून सात वर्षे मुलुखगिरी, चार वर्षे सरदारी केली. या १२-१३ वर्षात एक पैसा आम्हास दिला नाही. कागदपत्रेही नीट ठेवली नाहीत. खर्चमेळाचा ताळ नाही. येणे किती, देणे किती याचे भान नाही. फौजेच्या खर्चासाठी वेगळे ठेवलेल्या मुलुखावरही वसूलीची कर्जे घेतात. आम्हास शब्द विचारीत नाहीत. आपण तेथेच चौकशी करावी, तर ते न होता, आम्हास विचारले जाते. हे विपरित घडते म्हणून बोलावे लागते. गृहकलह श्रीमंतांनाही चुकला नाही. तुकोजी एक हिशोब नीट ठेवते, तर आम्ही राज्य डोक्यावर घेतले असते. आमची तशी हिंमत आहे. खार्वदाच्या सेवेत आमरण अंतर पडणार नाही. नाना फडणीसांच्या भरोशावर सोसतो आहोत. तुकोजीच्या अशा बेहिशोबी वागण्यामुळे, मला डोळे फाडून बघावे लागते. नानांनी महेश्वरी पायधूळ झाडावी.

श्री शंकर आज्ञेकरून

या पत्रात अहिल्याबाईंचे जातिवंत राजकारण्याचे सर्व गुण ओतप्रोत भरलेले आहेत. तुकोजी होळकरांचा मुलगा मल्हार, असाच बेफाम होता. तो आपल्या उर्मट वागण्याचे प्रजेला खूप त्रास देऊ लागला. अहिल्याबाईंनी दोनतीन वर्षे त्याला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांना मल्हारची तुरुंगात रवानगी करावी लागली. त्याला कैद करून आणण्याचे दिव्य अहिल्याबाईंनी केले. । थोरले सुभेदार मल्हाररावांनी शूर सरदारांना जहांगिरी, वतने दिली होती. त्यामुळे वतनदारांना प्रतिष्ठा लाभे. आपल्या जहागिरीच्या मुलखाची अंतर्गत व्यवस्था ते अत्यंत पोटतिडीकेने पाहत. अहिल्यादेवींनी तीच पद्धत चालू ठेवली. जहागीरदारांना घोडदळ आणि पायदळ सज्ज ठेवावे लागे. वेळ पडल्यास राज्याची सेवा त्यांना करावी लागे. राजकीय आज्ञा, काटेकोरपणे पाळाव्या लागत.

एकदा महदपूरच्या जहागीरदाराने प्रजेकडून अन्यायाने करवसूली केली. त्यांचे अधिकारी कोंबडं, तूप वगैरे वस्तू मागू लागले. याची तक्रार येताच त्या स्वतः महदपूरला गेल्या. चावडीवर थांबून लोकांचे जबाब घेतले. खात्री करून घेतली. तेवढ्यात जहागीरदाराचे कानी अहिल्याबाई आल्याची वार्ता गेली. ते फळफळावळाचे करंडे घेऊन आले. अहिल्यादेवी कशालाही शिवल्या नाहीत. त्यांनी जहागीरदारास समज दिली आणि सांगितले की, “या तक्रारीची आधी दखल घ्या. फराळ करण्यास तेव्हाच येऊ. आज पाणीसुद्धा पिणार नाही. प्रजेचे हित सर्वात जास्त महत्त्वाचे होते. या घटनेमुळे त्या जहागीरदाराची वागणूक कायमची सुधारली. त्याने जास्तीचा कर जनतेस परत दिला. अहिल्याबाई अशी अचानक भेट देत. त्यामुळे अधिका-यांवर त्यांचा दाब असे. धाक असे. दोषी अधिका-यांविरुद्ध कारवाई करायला त्या कधीच कचरल्या नाहीत. त्यांना माणसांची उत्तम पारख होती. त्यांनी जोडलेली माणसे आयुष्यभर त्यांची आणि राज्याची सेवा करीत राहिली. नोकर आणि त्यांची कुटुंबे याकडे अहिल्याबाईंचे पूर्ण लक्ष असे. नोकरांशी त्यांची वर्तणूक प्रेमाची, सहानुभूतीची आणि क्षमाशील अशी असे. औषधांची व्यवस्था करून नोकरांच्या आजारी कुटुंबीयांची त्या काळजी घेत. त्यामुळे त्यांची मातुश्री ही पदवी सार्थ होई. नोकरांच्या आजारी कुटुंबीयास भेटायला जाऊन विचारपूस करणे, धीर देणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे प्रत्येकाला अहिल्याबाईंविषयी आदरापेक्षाही वरच्या दर्जाची असलेली भक्ती होती. त्यांना 'देवी'ची पदवी सामान्य जनांकडूनच मिळाली होती. उत्तम कामगिरी करणा-यांना, महावस्त्रे, भूषणे देऊन त्यांचा जाहीर गौरव होई. त्यांना प्रतिष्ठा लाभे. सदैव विवेकाने कार्य करणा-या अहिल्याबाई कुणाच्याही दबावास बळी पडल्या नाहीत. प्रजेचे हित हेच त्यांचे ब्रीदवाक्य होते. आपण प्रजेसाठी आहात हीच ताकीद प्रत्येक अधिका-यास होती. | सर्व सुरळीत चालले होते. तुकोजी होळकरांचे हिशोब मिळत नव्हते. तेच एक मोठे शल्य होते. तेवढ्यात विंध्याचलाच्या परिसरात राहणा-या भिल्लांनी पुन्हा बंड पुकारले. ते चिरडून टाकणे त्यांना सहज शक्य होते. पण तसे न करता त्यांनी अंमलदाराकरवी त्यांना पत्र पाठवले. पत्रात लिहिले, “बाबांनो, माझ्या प्रजेला कुठलाही भेदभाव न करता मी सुखी करण्याचा प्रयत्न करते आहे. तुमच्या बंडाचे कारण मला सांगा. तुमचा त्रास, अडचणी मी दूर करते.' भिल्ल मंडळी आली. आपुलकी आणि प्रेमळपणाने त्यांनी भिल्लांच्या अडचणी दूर केल्या. भिल्ल त्यांचे भक्त झाले. | प्रेम आणि शक्ति या दोन्ही गोष्टींचा वापर करून त्यांनी राज्याची प्रगती साधण्याचा सदैव प्रयत्न केला. त्या प्रजेसाठीच जगत होत्या. या मुक्ताबाईंचा मुलगा नथोबा याची प्रकृती साथ देत नव्हती. कदाचित लग्नानंतर प्रकृती सुधारेल म्हणून नथोबाचं लग्न बाळाबाई हिच्याशी मोठ्या थाटात करण्यात आले. घरात बाळाबाईचा वावर सुरू झाला. अहिल्याबाईंना बरं वाटलं. राजकारणात तर अनेक रंग होते. इंग्रजांच्या पलटणी वाढत होत्या. सुरत, भडोच इकडे पलटणी होत्या. रघुनाथरावही इंग्रजांच्या बाजूस झुकले होते. सुजाउद्यौलाच्या मुलाने आईला आणि आजीला कैद केले होते. तुकोजीनेही वसूल महेश्वरी देऊ नये असे सांगून ठेवले होते. त्यामुळे अहिल्याबाई उदिग्न होत्या. गोहदच्या किल्ल्याची भांडणे सुरूच होती. एवढ्यात दोन मुस्लिमांना घेऊन किल्लेदार आले. अहिल्याबाई नेहेमीप्रमाणे घोंगडीवर बसल्या होत्या. एकजण पुढे होऊन मुजरा करत अहिल्याबाईंना सांगू लागला की, बादशहाचा इनायतनामा आहे. तो आपण स्वतः उभे राहून घ्यायला हवा. अहिल्याबाईंनी ‘तो वजीरापाशी द्या' म्हणून सांगताच, मुस्लीम दूत म्हणाला, "आपकोही खडी ताजीम इनायतनामाको देनी पड़ेगी. ये इनायतनामा खड़ी ताजीम देके, इज्जतके साथ लेना है, ये अर्जी है!' आता मात्र अहिल्याबाईंना संताप आला. त्या म्हणाल्या, “पातशहाची जबाबदारी मराठ्यांवर आहे. त्यांच्या इनायतनाम्याची इतकी मिजास? श्रीमंत पेशव्यांचे पत्र पण आमचे वजीरांचे हाती येते, तर तुमचा इनायतनामा वजीर आणू शकत नाही? ही अट आम्हास मान्य नाही. श्रीमंत पेशव्यांशिवाय आम्ही कोण्या बादशहाकरता उभे राहणार नाही. मुकुंदरावे, त्यांनी दिलं तर तो इनायतनामा इकडे आणा आणि देणार नसतील तर त्यांना निरोप द्या!'' मुकुंद हरीजवळ पत्र देऊन मुस्लिम तणतणत गेले. | भाद्रपद लागला की हरतालिका, गणेशचतुर्थीच्या उत्सवास त्यांचं मन रमे. पण पितृपक्षात चार श्राद्धे करताना त्यांना इंदूरचे दिवस आठवत. मालेरावाने खून केलेल्या हिरादासीच्या प्रियकराची पण त्यांनी समाधी बांधली. दानदक्षिणा देऊन त्या मन हलके करण्याचा प्रयत्न करीत. मुस्लिम फकीरांनाही श्रावणात खैराती दिल्या जात. फकीरांना त्या सांगत, “आम्ही आपल्या दग्र्यास वर्षासने देतो. मंदिरांचा नाश करणाच्या आपल्या भावांना सांगा धर्म वैर करायला शिकवत नाही. ईश्वर-अल्ला एकच आहे.''

दरम्यान पुणे येथून सदाशिव दिनकर हिशोब बघण्यास आले होते. चार दिवस अहिल्याबाई कागदपत्रे पुरवत माहित देत होत्या. तुकोजीराव वसूल परस्पर इंदूरलाच नेतात हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना अहिल्याबाईंना बाजूला करून सर्व सत्ता हवी हेही लक्षात आले. अहिल्याबाईंनी सर्व दानधर्म खाजगीतून केला इतकेच नव्हे तर फौजेलाही त्याच पैसा पुरवत आहेत हेसुद्धा कळले. ते अहिल्यादेवींना म्हणाले, "आपला कारभार तर गंगाजळाप्रमाणे निर्मळ. पण तुकोबास सत्ता हवी. त्यामुळे ते अडवणूक करीत आहेत." अहिल्याबाई म्हणाल्या, “तेवढेही केले असते. पण भरभराटीची आशा नाही. मी बाजूस होण्याचा अवकाश चार वर्षात निशाण खाली येईल. वसुलीच्या पन्हाळी यांच्या भोग विलासात जातात. माझी खाजगी खर्च केली तरी त्याच पन्हाळ्यातून जाणार तेही केले. करोड़ रुपये ओतले. पण मद्याच्या बुधल्यात गेले. यांच्या रक्षेच्या दारात हत्ती झुलतात. मी मल्हाररावांची सून आहे. दौलतीसाठी रक्त शिपले आहे. मी राज्याचा विनाश बघू शकत नाही. हिंमत असेल तर तुकोजी होळकरांची खाजगी तपासा. सगळ्याची उत्तरे तिथे मिळतील. हा तपास आधी घ्या आणि मग मला प्रश्न विचारा. हे होत नाही तोवर मी कशाचीही उत्तरे देणार नाही! आम्ही आमच्या पैशांवर तुळशीपत्र ठेवून बसलो आहोत. हे राज्य भस्मचर्चित शंकराचे असे आम्ही मानतो. आमची सही कुठेही नाही. शंकरआज्ञेवरून अशी सही असते. त्याची आज्ञा आहे तोवर कर्म करू!'' पुणे येथील वकील या बुद्धिवादावर काही बोलू शकले नाही.

| एकदा सातआठ भिल्ल एका युवकाला घेऊन आले. आले ते अहिल्याबाईंच्या पायावर पडले. म्हणाले, “आम्ही लई वंगाळपन केलं. आम्हास अद्दल घडवा. उखळात घाला नाईतर चाबूक मारा. यानला आपलं दर्सन घ्यायचं व्हते पन हे मागून उमजलं. आधी आम्ही त्यांना लुटाया लागलो. मंग हे म्हनाले समर्द घ्या पन ही अहिल्यादेवींची शाल राहू द्या. त्यांच्या पायावर वाहायची आहेअन मंग आमाले लई लाज वाटली. यानला घिऊन आलो. आता आमचं काई बी करा!” अहिल्याबाईंनी विचारलं. कुठून आलात?.... तो युवक म्हणजे कवि अनंतफंदी होता. संगमनेरचे अनंतफंदी. त्यांनी अहिल्यादेवीना महेश्वर घाटावरचे काव्य ऐकवले. खुप गोड आवाज होता. अहिल्याबाईंना कळले की हे लावण्या गातात. अहिल्याबाई म्हणाल्या, “आपले कवित्व ईश्वरे दिलेली-रसाळ वाचा, गोड आवाज! पोवाडे गा, भक्तिपर गीते गा. नाशवंत स्त्रीदेहाच्या वर्णनात आपली प्रतिभा का दवडता? भोग भोगायला कुणाला सांगावे लागत नाही. त्यागाचा उपदेश करावा लागतो. तो करा. समाजसुधारणा करणा-या रचना करा." अनंतफंदीचा कडेतोडे देऊन सत्कार करण्यात आला. भिल्लांनाही घोंगड्या दिल्या गेल्या. यानंतर, अनंतफंदींनी फटके लिहिले. “बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको!'' हा फटका त्यांचाच.

त्याचवेळी सवाई माधवरावांचे लग्न ठरल्याचा लखोटा आला. नाना फडणीसांनी अहिल्याबाईंना, 'लग्नास यावे अशी इच्छा स्पष्ट सांगितली होती. १७७४ चा जन्म आणि १७८४ त लग्न. आज हसू येईल पण तेव्हा तशीच पद्धत होती. अहिल्याबाई म्हणाल्या, “धन्य त्या नानांची आणि हरिपंताची! कोसळते छत उभे केले!'' अहिल्याबाईंची श्रीमंतावर अशी थोर निष्ठा होती.


अहिल्याबाईंची खाजगी तिजोरी |

होली कि हिशोबांचा हा गोंधळ वाचून वाचकांना प्रश्न पडेल की अहिल्याबाईंना तुकोजी वसूल देत नव्हते तर हे धन आले तरी कुठून? त्यासाठी मागची हकीकत सांगायला हवी. एकदा सुभेदार मल्हाररावांनी श्रीमंत बाजीरावांजवळ इच्छा व्यक्त केली की, राज्यकारभारासाठी त्यांच्याकडे जे इलाखे दिलेत त्यातले काही त्यांना बक्षीसपत्र करून देऊन टाकावे. म्हणजे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची काळजी राहणार नाही. आपल्या या शूर सुभेदाराच्या इच्छेला मान देऊन सालीना तीन लाख रुपये उत्पन्नाचा इलाखा पेशव्यांनी गौतमाबाईंच्या नावाने इनाम दिला. त्या उत्पन्नाला खाजगी उत्पन्न म्हणू लागले. त्यात वाढ होत होत ते पंधरा लाखापर्यंत गेले. उत्तम शेती, व्यापार उदीम यामुळे हे उत्पन्न वाढले. त्यानंतर लढाईत जी लूट मिळे तिचा काही हिस्सा खाजगीत, काही पेशवे दरबारी व उरलेला सरकारी तिजोरीत भरणा होई. मल्हाररावांनी अगणित लढाया केल्या. खाजगी, सरकारी आणि पेशवे तिजोरीतही भर टाकली. अहिल्याबाईपण चौथाई सरदेशमुखी वसूल करून सरकारी तिजोरी मजबूत ठेवीत. मल्हाररावांच्या मृत्यूच्या वेळी या खाजगी कोशात पंधरा कोटी रुपये होते. याच कोषातून अहिल्यादेवींनी अनेक सुधारणा केल्या. परंतु त्यांच्या दुर्दैवाने मालेरावासारखा कुपुत्र त्यांच्या दैवी आला. तुकोजी होळकरसारखे पैशांची उधळपट्टी करणारे सुभेदार मिळाले. लायक वारसदार लाभता तर अहिल्यादेवींनी सुवर्णाच्या नगरी उभ्या केल्या असत्या.

सरकारी तिजोरीची भिस्त वेगवेगळ्या करांवर असे. पेशवे दरबारच्या कागदपत्रावरून समजते की माळव्याचा वसूल चौरयाहत्तर लाख रुपये होता. अहिल्याबाईंच्या कारभारात तो वाढून एक कोटी साडेपाच लाख झाला होता. अहिल्याबाईंनी खाजगी आणि सरकारी तिजोरीचे हिशोब स्वतंत्र ठेवले होते. खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीवर पडलेली त्यांना सहन होत नसे. दोन्ही कोषावर त्यांचे नियंत्रण होते. अहिल्याबाईंच्या काळात कधी दुष्काळ पडला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी असल्यामुळे खर्च जास्त नसे. युद्धे राज्यात फारशी झाली नाहीत. होळकरांचे राज्य श्रीमंत पेशव्यांच्या अधिपत्याखाली होते. अहिल्याबाईंमध्ये असामान्य नीतिनैपुण्य आणि असामान्य योग्यता होती. त्यांच्या मनी पेशव्यांबद्दल भक्ति होती. त्यांच्या मर्जीविरुद्ध काहीही न करताही अत्यंत अभिमानास्पद रीतीने त्यांची कारकीर्द चालू होती. पेशवे स्वतः अनेक वेळा अहिल्याबाईंचा सल्ला घेत. पुणे येथील राजकारणी सुद्धा. अहिल्याबाईविषयी आदर बाळगून होते. तुकोजी होळकरांनी पैशांचे घोळ केले तरी अहिल्यादेवीच्या कारभाराला त्यांनी सदैव गंगाजळ निर्मळ असेच म्हटले. महेश्वरी पुणे दरबारचा वकील असे. त्यांनी लिहिलेले या पत्रांचे पुस्तक 'महेश्वर दरबारची बातमीपत्रे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात अहिल्यादेवींच्या रोजच्या कामकाजाची भरपूर माहिती असे. त्यांच्या रोखठोक बोलण्यावर आणि कडक, फटकळ बोलण्यावरसुद्धा त्यांच्या नि:स्पृहपणाची छाप असे. कोणाचेही अन्याय दडपण त्यांनी मानले नाही. प्रत्यक्ष सासरे मल्हाररावांनासुद्धा फटकारण्याची त्यांची हिंमत होती. मल्हाररावांना पुणे येथे कर्जफेड करायला लावणे हा त्याचा एक उत्कृष्ट नमूना आहे. त्या काळी भारतातील राजे, जमीनदार, अधिकारी अहिल्याबाईंबद्दल नितांत श्रद्धा बाळगून होते. त्यांची रीत आणि धोरणे स्वच्छ होती. युद्धाच्या काळातही कोणत्याही राजाने होळकर राज्यावर चढाई केली नाही. टिपू सुलतान आणि निजामही अहिल्यादेवी विरुद्ध कधीही उठले नाहीत. पुणे, ग्वाल्हेर, भरतपूर, जयपूर, उदयपूर, जोधपूर, सातारा आणि इतरही राज्यातले वकील महेश्वरी होते. होळकर राज्याला अतिशय प्रतिष्ठा प्राप्त झाली होती ती अहिल्यादेवींच्या वागण्यामुळेच होय!

का अहिल्याबाईंनीसुद्धा अनेक राज्यात आपले चतुर प्रतिनिधी ठेवले होते. हैद्राबाद, लखनौ, भोपाळ, दिल्ली, कलकत्ता येथून त्यांना सर्व कामकाजाची पद्धतशीर माहिती मिळे. गुप्तहेरांकडून बातम्या समजत. त्यांचे हे खाते फारच ताकदीचे होते. सर्व राज्यांची माहिती त्या हुशार स्त्रीला असे. त्या माहितीचा उपयोग त्या आपल्या प्रजेच्या भल्यासाठीच करत.

(पुढील भागाचे लिखाण चालू आहे, जर तुम्हाला आत्ताच पाहिजे असेल तर आम्हाला shabnamniranjanyamgar@gmail.com या आयडी वर मेल पाठवा🙏)

Post a Comment

Comment here what you think about this

أحدث أقدم