खालिस्तानी चळवळ हे भारताला पडलेलं दुःस्वप्न. पाकिस्तान भारताच्या कुठल्याही गोष्टीत बिब्बा घालायला टपून बसलेलाच असतो. फक्त यावेळी मदत करणारा एकटे पाकिस्तानी नव्हते तर कॅनेडियन पण होते. हळूहळू क्रियाप्रतिक्रियेचा खेळ सुरु झाला. अकाली दलाला शह देण्यासाठी ज्यांना इंदिराबाईने ताकद दिली त्यातून खलिस्तानवाद्यांना रसद मिळत गेली. भस्मासुर उलटतो आहे म्हटल्यावर बाईंनी अतिशय धाडसी निर्णय घेतला. खलिस्तानवादी अतिरेक्यांचे आश्रयस्थान बनलेल्या सुवर्णमंदिरावर सैन्याने हल्ला चढवला. पुन्हा शीख समाजात संतापाची लाट उसळली. त्या लाटेने इंदिराबाईंचा बळी घेतला. आता उलटी लाट उसळली. केशधारी हिंदूंना ना सर्वसामान्य हिंदूंबद्दल आणि हिंदूंना केशधारी हिंदूंबद्दल भीती वाटू लागली. काँग्रेसच्या नेत्यांच्या पुढाकाराने संपूर्ण उत्तर भारतात शिखांची अमानुष हत्या होऊ लागली. शरीरं आणि मनंही दुभंगली. देश आणखी एका फुटीच्या उंबरठ्यावर उभा होता. 

देश तुटत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गप्प बसत नसतो... तेव्हाही बसणे शक्य नव्हते.

संघाच्या रचनेतून योजना आखण्यात आली. एक व्यक्ती या कामासाठी निश्चित करण्यात आली.

कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन... संघकार्यात मुरलेला माणूस. संघाचा अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख. ईशान्य भारतात अतिशय प्रतिकूल परिस्थितीतल्या कामाचा अनुभव.

सुदर्शनजी कामाला लागले.

समस्येचा अभ्यास आणि समस्येचं समाधान या दोन्हीवर चिंतन होऊन आराखडा तयार झाला.. 

एका दिवसात प्रश्न सुटणार नव्हते. सातत्याने दीर्घकाळ प्रयत्न करणे गरजेचे होते. पाण्याची धार सतत पडत राहिली तर कातळसुद्धा भंगतो यावर संघ कार्यकर्त्यांचा दृढ विश्वास असतो. इथेही तेच झालं.
तब्बल १० वर्षे प्रयत्न केले गेले.

• या कामाचे महत्व ओळखून पंजाबमधल्या सर्व संघप्रचारकांना नित्याच्या संघकामातून मुक्त करून केवळ जनजागरणासाठी नियुक्त केले

• २००० गावांमध्ये संपर्क झाला. आज शिखांचे मित्र म्हणवणाऱ्या पाकिस्तान्यांनीच १९४७ला शीख आणि सिंधी जनतेचे हत्याकांड केले होते याची आठवण करून दिली जाऊन पाकिस्तानच्या प्रेमाच्या पुळक्यामागचा धोका स्पष्ट केला.

• दहशतवाद्यांच्या भीतीपोटी वृत्तपत्रे, विचारवंत, प्राध्यापक, प्रवचनकार सगळे गप्प होते. चुकीच्या गोष्टींवर टीका करायला कचरत होते. त्यांना स्वयंसेवकांनी बोलते केले.

• राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांचे पथक समाजातील मान्यवर महिला कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहिल्या. महिलांचा स्वतःचा आवाज उमटू लागला.

• खलिस्तानी लढवय्यांचे रूपांतर पुढेपुढे फक्त खंडणीखोरांमध्ये होऊ लागले होते. स्त्रियांवर हात टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यांच्या या रुपाचीही जाणीव पंजाबमधल्या शिखांना करून देण्यात येऊ लागली. शीख समुदायालाही खलिस्तानवाद्यांचे खरे रूप दिसून येऊ लागले. 

• 'पंजाब पीडित सहाय्यता समिती'ची स्थापना संघाच्या पुढाकारातून झाली. १० वर्षांत अतिरेक्यांनी दहाहजार बळी घेतले होते. त्यात शीख निम्म्याहून जास्त होते. त्यांच्या घरच्यांची परवड झाली होती. अशा कुटुंबांना या समितीतर्फे खूप मदत केली गेली. घातल्याचे शिक्षण, नोकरी व अन्य प्रकारचे साहाय्य झाले.

• विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने हरिद्वार ते अमृतसर अशी मोठी संत पदयात्रा पदयात्रा निघाली. हिंदू-शीख यांच्यातील सामान तत्वांची उजळणी केली गेली. कुठलेही शासकीय संरक्षण न घेता आदरणीय संत हे काम करत आहेत हे पाहून जनतेवर चांगला परिणाम झाला. संत नामदेवांना पंजाबात खूप मान त्यांचेही अभंग गायले गेले आणि खलिस्तानची मागणी त्यांच्या विचारांशी कशी विसंगत आहे हेस सांगितले गेले.

• गावोगावी मान असणाऱ्या कीर्तनकारांचे अभ्यासवर्ग घेऊन गुरुग्रंथसाहेबमधील वचनांच्या आधारे खलिस्तानची भूमिका कशी खोडून काढावी याचे प्रशिक्षण दिले गेले.

• पंजाबमधील गुरुद्वारांचा दुहीसाठी वापर होत होता तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले.

• पंजाबबाहेर शिखांची अन्य हिंदूंमध्ये प्रतिकूल प्रतिमा निर्माण झाली होती आणि शिखांमध्ये हिंदूंबद्दल नाराजी होती. त्यावर उपाय म्हणून 'राष्ट्रीय शीख संगत' या संघटनेचे कार्य सुरु झाले. तिच्यात शीख व बिगरशीख दोन्ही असल्याने एकोपा निर्माण व्हायला मदत झाली.
गावोगावी या विचारांचा प्रचार, प्रसार म्हणजे जीवाशी गाठ होती. माथी भडकलेले अतिरेकी केव्हा खेळ खलास करतील खात्री नव्हती. एकदा विपरित गोष्ट घडलीच. पंजाबमधल्या 'मोगा' याठिकाणी खलिस्तानवादी अतिरेक्यांनी थेट संघाच्या शाखेवर हल्ला केला. त्यात जवळपास २५ स्वयंसेवकांना जीव गमवावा लागला. हा पुन्हा एकदा हिंदू विरुद्ध शीख तेढ निर्माण करण्याचा पाकपुरस्कृत खलिस्तानवाद्यांचा प्रयत्न होता. संघाने आततायी प्रतिक्रिया दिली असती तर सगळ्या मेहनतीवर बोळा फिरला असता. पण कोणतेही प्रत्युत्तर दिले गेले नाही. घटनेचा निषेध म्हणून पुकारलेल्या बंदमध्ये हिंसेची घटना घडली नाही. खुद्द मोगामध्ये दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला संघ स्वयंसेवकांनी निर्भय होऊन संचलन काढले आणि ‘आम्ही घाबरलो नाहीये आणि आम्ही शिखांविरोधातही नाही’ असा ठाम संदेश समाजात दिला गेला. केवळ समाजातली दुफळी कमी व्हावी म्हणून वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून संघाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत हे हळहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले. लोकांची सैरभैर मने शांत होऊ लागली.

पंजाबमधली ही धगधगती वर्षं निभावून नेण्यामध्ये पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, के. पी. एस. गिल यांचा खूप मोठा वाटा आहे. पण संघाचा वाटाही कुठे कमी नाहीये. कारण देशावरचे संकट म्हणजे आपल्यावरचे संकट हे संघ पहिल्यापासून मानत आला आहे कारण संघ स्वतःला समाजापेक्षा वेगळं मानतच नाही.

या सगळ्या कसोटीच्या काळात सुदर्शनजींनी अक्षरशः जीवाचे रान केले. योजना बारकाव्यांसहित आखण्यापासून ते अंमलबजावणी करण्यापर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे साध्य झाल्या. त्यांचा स्वतःचा अभ्यास दांडगा असल्यामुळे त्यांनी गुरुग्रंथसाहेब व अन्य साहित्याच्या आधारे 'यूं दहला पंजाब' ही पुस्तिका लिहिली ज्यात शीख, खालसा पंथ यांचा उदयच हिंदू धर्म रक्षणासाठी झाला असून शीख गुरूंनी धर्मरक्षणासाठी बलिदान कसे केले याचे विवेचन केले गेले होते. पंजाबमध्ये संघाने १० वर्षे जे जनजागरण केले त्याचा आधारच ही पुस्तिका होती.

पुढे २००० साली सुदर्शनजी संघाचे पाचवे सरसंघचालक झाले.

***

मला स्वतःला यातले अगदीच अल्पस्वल्प माहित होते. कमलनाथ मुख्यमंत्री झाले तेव्हा नि परवा शीखविरोधी दंगलीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात आला. म्हणून सुदर्शनजींचे चरित्र घेतले आणि त्यात पाहिल्यावर इतिहासातलं एक महत्वाचं पान उलगडलं. काही जाणत्या संघकार्यकर्त्यांशी चर्चा झाली.

अजून थोडी शोधाशोध केल्यावर कळलं की खुशवंतसिंह यांनी आपल्या 'अ हिस्ट्री ऑफ सिख्स' या पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे. ते म्हणतात :
"RSS has played an honorable role in maintaining Hindu-Sikh unity before and after the murder of Indira Gandhi in Delhi and in other places. It was the Congress (I) leaders who instigated mobs in 1984 and got more than 3000 people killed. I must give due credit to RSS and the BJP for showing courage and protecting helpless Sikhs during those difficult days. No less a person than Atal Bihari Vajpayee himself intervened at a couple of places to help poor taxi drivers.”

आताच्या मुख्य धारेतल्या माध्यमांमध्ये या संघप्रयत्नांची चर्चा जाऊदे, उल्लेखसुद्धा आढळणार नाही. ते जर हे काम करत नसतील तर हे प्रयत्न सर्वांपर्यंत नेणे हे आपलं काम आहे. संघ हिंसाचार करतो हे सांगायला अनेक अर्धेकच्चे अभ्यासक, विखारी विरोधक पुढे येत असतात त्यावेळी 'मोगा' शाखेवर गोळ्या खाऊनही त्याचे शांततेने उत्तर देणाऱ्या संघाचे जिवंत उदाहरण त्यांना द्यायला हवे.  खरंतर अशी शेकडो उदाहरणे आहेत. फक्त मीडिया दाखवतोय, 'विचारवंत' जे सांगत आहेत त्याच्या पुढे जाऊन, डोळे उघडे ठेऊन आपण स्वतः अनेक गोष्टी शोधल्या पाहिजेत आणि त्या मिळाल्या की सगळ्यांसमोर ठेवल्या पाहिजेत..

ही पोस्टसुद्धा सर्वदूर पोचवावी असे यानिमित्ताने आवाहन करतो.

--- प्रसाद फाटक

संदर्भ :
१) डॉ. शरद कुंटे लिखित पू. सुदर्शनजी यांचे चरित्र

२) https://arisebharat.com/0201/05/01/rss-swayamsevaks-protected-sikhs-during-the-1984-anti-sikh-riots/


Post a Comment

Comment here what you think about this

أحدث أقدم